*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कथालेखक शरद काळे यांचे निधन*
*कणकवली/प्रतिनिधी*
कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, निष्ठावंत शिक्षक आणि खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य शरद काळे ( 82) यांचे बुधवार 26 मे रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोकणच्या साहित्य चळवळीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मूळ वाडा-पडेल येथील असलेले शरद काळे हे नोकरीच्या निमित्ताने खारेपाटण येथे आले आणि तिथेच स्थायिक झाले. तब्बल सुमारे पन्नास वर्ष त्यांनी निष्ठेने साहित्य लेखन केले.सत्तकथेतही त्यांच्या कथेला
स्थान मिळाले होते.इंग्लिश विषयाचे अध्यापन करताना त्यांनी अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पदरमोड करून शिक्षणही दिले.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रारंभीच्या दिवसात त्यांनी या चळवळीत काम करताना जबाबदार मार्गदर्शकाची भूमिका निभावली आणि कोकणातील अनेक नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन केले.त्याचबरोबर मालवणी बोली साठीही त्यांनी कार्य केले. भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे मराठीतील पहिले विजेते कादंबरीकार वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या सहवासात काळे यांच्या साहित्यिक वाटचालीची
जडण-घडण झाली.विख्यात समीक्षक डाॅ. द.भि. कुलकर्णी यांचे ते आवडीचे विद्यार्थी, गोखले काॅलेज कोल्हापूर येथे त्यांना कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. “केले मन वेगळे ” हा त्यांचा
लक्षवेधी कथासंग्रह प्रकाशित.
जुन्या काळातील सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर ,आरती या अभिजात मसिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून ललित, कथा व कविता लेखन त्यांचे प्रसिद्ध झाले. खारेपाटण गावात सुमारे ७० वर्षे वास्तव्य राहताना विद्यार्थीप्रिय व समाजाभिमुख, उपक्रमशील शिक्षक म्हणून ख्याती त्यांनी मिळवली.खारेपाटण हायस्कुल नावारूपाला आणण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
पत्नी,दोन मुली व एक मुलगा,सून जावई,नातवंडे असा परिवार असून प्रसिद्ध कवयित्री डॉ अनुजा जोशी-काळे यांचे ते वडील होत!