*कोकण Express*
*पर्यायी रस्त्याचे काम अर्धवट ठेवून ठेकेदार व कामगार गायब*
*ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोडामार्ग-बेळगाव या राज्यमार्गावर असलेल्या भेडशी येथील पावसाळ्यात उपयोगी ठरत असलेल्या पर्यायी रस्त्याचे काम अर्धवट ठेवून ठेकेदार व त्या ठिकाणी राहत असलेले कामगार गायब झाल्याने या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.तर संबंधित विभागाने हा रस्ता तात्काळ पुरा न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा भेडशी ग्रामस्थांनी दिला आहे.
दोडामार्ग-तिलारी मार्गावरील भेडशी खालचा बाजार दामोदर मंदिर येथील कॉजवे कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात हा कॉजवे पूर्णपणे पाण्याखाली जात असतो.त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाते.परंतु हा पर्यायी मार्ग पूर्णपणे खराब झाल्याने याकडे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भिसे यांनी लक्ष वेधले होते.त्यानंतर काही दिवस कामही सुरू झाले.मात्र आज सकाळपासून या रस्त्याचे काम बंद असल्याने व ज्या ठिकाणी कामगार झोपड्या बांधून राहत होते त्या ठिकाणी कोणीही नसल्याने ठेकेदार व कामगारांनी काम अर्धवट टाकून गायब झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता खडी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत हात झटकले.
दरम्यान पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.खालच्या पुलावर पाणी येऊन वाहतूक बंद झाल्यास किंवा पर्यायी मार्गाने वाहने हाकताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी विचारला असून काम तात्काळ सुरू न झाल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा भेडशी ग्रामस्थांनी दिला आहे