*कोकण Express*
*चिंदर येथील पत्नीच्या खुनाच्या आरोपातून पती निर्दोष*
*संशयितांच्या वतीने अॅड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपातून पती अमित दत्तात्रय मुळे (चिंदर ता. मालवण) याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
या घटनेच्या दाखल फिर्यादीनुसार, चिंदर सडेवाडी येथील आरोपी अमित मुळे – याचा प्रेमविवाह २०१० मध्ये पूर्वाश्रमीची दर्शना घाडीगांवकर ( अनुराधा अमित मुळे) हिच्याशी झाला होता. लग्नानंतर वर्षभराने उभयता नोकरीसाठी भांडूप मुंबई येथे गेले. कालांतराने अनुराधा हिची ओळख एका तरुणाशी झाली. त्या ओळखीतून मैत्री झाली व मोबाईलवरून एकमेकांशी संभाषण होऊ लागले. आरोपी अमित मुळेला या गोष्टी रुचत नसल्याने संशय घेऊन दारू पिऊन तो अनुराधाला मारझोड करत असे. त्यामुळे अनुराधा कंटाळली होती. याबाबत तिने आई व कुटुंबियांना अनेकदा फोनही केले होते. त्यानंतर घटनेपूर्वी सहा महिने अगोदर अमित हा अनुराधाला १५ दिवसांसाठी गावी जाऊया असे सांगून चिंदर येथे कायमस्वरूपी घेऊन आला. त्यानंतर किरण कांबळी यांच्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये अमित कामाला राहिला होता.
दरम्यानच्या काळात अनुराधा हिचा मित्र देखील तिला गावी येऊन भेटून गेला होता. २६ सप्टेंबर २०१९ रोजी दु. १.३० वा. च्या दरम्याने अनुराधा ही घराच्या पडवीमध्ये कपडे धुवत असताना अमितने तिचा गळा आवळून तिला ठार मारले. घटनेनंतर १.४५ च्या सुमारास अमित हा त्याची वहिनी सानिका मुळे हिच्या घरी घाबरलेल्या अवस्थेत आला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर भावाच्या वहिनीच्या मदतीने प्रा. आ. केंद्र आचरा येथे नेण्यात आले व तेथे तिला मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर अनुराधाचा भाऊ मनोहर घाडीगांवकर याने आचरा पोलिसांत आरोपीने चारित्र्याचा संशय घेत, वारंवार मारहाण करून खून केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी केला होता.
सुनावणीत सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुराव्यामधील विसंगती, परिस्थितीजन्य पुराव्यामधील त्रुटी आदीमुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.