*कोकण Express*
*जाती पातीची उतरंड कशाला,शिकूया थोडस माणूस व्हायला:सिने दिग्ददर्शक नागराज मंजूळे*
*कासार्डे :संजय भोसले*
जनवादी साहित्य संस्कृती संमेलन, पहिले सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे नुकतेच पार पडले .या संमेलनात सर्वात महत्त्वाचा बदल काय झालं असेल तर तो म्हणजे कोणत्याही प्रकारचा झगमगाट नाही, आतिषबाजी नाही, पारंपरिक पद्धतीचे दिपप्रज्वलन नाही ,तर कार्यक्रमाचे उद्घाटन जातीपातीची उतरण उतरवून एका समान रेषेत ठेवण्यात आली. आणि कोणतीही वर्णव्यवस्था न ठेवता सर्वांसमोर फक्त आणि फक्त माणूसच ठेवला. तोही समरसता जोपासणारा .आणि यासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावन हाताने हे कार्य पार पाडले.
जनवादी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा संध्याताई नरे पवार (ज्येष्ठ पत्रकार व लेखिका ),स्वागताध्यक्ष संजय वेतूरेकर (जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती), विकास सावंत (अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी ),किशोर जाधव (माजी अध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र), सुबोध मोरे (निमंत्रक दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती महाराष्ट्र), चंद्रकांत जाधव (ज्येष्ठ लेखक गोवा) सत्कारमूर्ती:— प्राध्यापक नवनाथ शिंदे (सामाजिक कार्यकर्ता आजरा) सिद्धार्थ देवळेकर (कथालेखक लांजा )दुर्गादास गावडे (ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ता गोवा) आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग तीन दिवस 7,8 व 9 मे 2022 रोजी चालणार्या या संमेलनाचे उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते जातीपातीची उतरंड उतरवून झाले. याप्रसंगी ते म्हणाले की कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळाली नाही त्यासाठी शिवाजी महाराज, माँ. जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज ,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी अनेक मंडळी आयुष्यभर झीजली आहेत. तेव्हा कुठे सध्या माणूस माणसात आहे .आणि माणूस म्हणून जगत असताना त्याच्या सर्व प्रवृत्ती लक्षात घेणे गरजेचे आहे. जंगलाच्या आगीची कथा सांगून ते म्हणाले की समाजात आग लावणारे भरपूर आहेत .मात्र आपण कोणत्या समूहात मोडतो हे लक्षात घेतले पाहिजे .आग लावणाऱ्या समूहाचे आपण निश्चितच नसावे .कारण आग विझवणारेच सर्वश्रेष्ठ असतात.
या साहित्य संमेलना विषयी बोलताना मंजूळे म्हणाले की संमेलने होणे गरजेचे आहे. कारण त्यातून संवाद साधला जातो. जनमानसाला संवादाची गरज असते. पण यासाठी साहित्य संमेलनाची वाट पाहू नये, किंवा अपेक्षा धरणे हे बरोबर नाही .साध्या संवादानेही माणसे जोडता येतात. या सिंधुभूमीत अनेक सामाजिक, राजकीय तसेच साहित्यात आणि रंगमचावर काम केलेल्या महान व्यक्तींचा पदस्परार्श झालेला आहे. शिवाय संमेलनस्थळी म्हणजे आर. पी. डी .हायस्कूलच्या प्रांगणात कविवर्य केशव सुत यांचा वावर होता हे ऐकूनच थ्रील व्हायला होतं .केशवसुत एका कवितेत म्हणतात की, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, नाही मी कुण्या पंथाचा. म्हणजे या संमेलनात जातीची उतरंड उतरवून समान पातळीवर माणूस बनवला ही बाब स्पष्ट होते. शिवाय उतरंडीतील तळचा मडका स्त्रियांचा होता ,संख्येने जास्त असलेल्या वर्गाचा .त्यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असून देशात निम्मे हिस्सेदारी त्यांचीच आहे. मात्र तरीही त्या उपेक्षित राहिल्या ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे .आता बदल झालाय ,अजूनही बदल होणार यात मुळीच शंका नाही.