*कोकण Express*
*आमचा विरोध डंपर चालकांना नाही, तर बेकायदेशीर क्वारी मालकांना…*
*संजू परब; भाजपच्या इशाऱ्यानंतर डंपर चालकांनी घेतली भेट…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आमचा विरोध डंपर चालकांना नाही, तर बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या क्वारी मालकांना आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने थेट डंपर चालकांवर कारवाई करू नये, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केली आहे. भाजपच्या वतीने श्री. परब यांच्या इशाऱ्यानंतर आरटीओ प्रशासनाने थेट खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचा बडगा उभारला. याच पार्श्वभूमीवर चालकांनी श्री. परब यांची भेट घेतली. यावेळी श्री.परब यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून डंपर चालकांना कोणताही त्रास देऊ नये, तुम्ही थेट क्वारी उत्खननावर पहिल्यांदा कारवाई करा, असे सांगितले. याबाबत श्री. परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी जितू गावकर, झेवियर फर्नांडिस, प्रशांत पांगम, शाम धुरी, महेश धुरी, उमेश पेडणेकर, महेंद्र पालव, आदित्य वालावलकर, राजन आंबेकर, विजय गावडे, प्रितेश परब, आशिष झाट्ये, भालचंद्र धुरी आदींसह मोठ्या संख्येने डंपर चालक उपस्थित होते.
ते म्हणाले, वेत्ये परिसरात अनधिकृत क्वारी उत्खनन सुरु आहे. मात्र याकडे महसूल प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाचा व क्वारी उत्खनन करणाऱ्या मालकांचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा श्री.परब यांनी भाजपाकडून दिला होता. दरम्यान त्यानंतर आरटीओ कडून खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे आज चालकांनी श्री. परब यांची भेट घेतली. तसेच आमच्यावर होत असलेली कारवाई अन्यायकारक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. परब म्हणाले आमचा तुम्हाला विरोध नाही, तर अनधिकृत सुरू असलेल्या क्वारी उत्खननाला आहे. त्यामुळे आरटीओने थेट चालकांवर कारवाई न करता क्वारी मालकांवर पहिल्यांदा कारवाईचा बडगा उभारावा, असे सांगितले. तसेच यासंदर्भात त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून थेट डंपर चालकांवर सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.