*कोकण Express*
*भारतीय मजदूर संघाचे 9 मे रोजी कणकवली प्रांत कार्यालय येथे धरणा आंदोलन*
*वाढत्या महागाईमुळे कामगार आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल उठविणार आवाज*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मागील सात आठ महिन्यापासून महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून मोल मजुरी करणाऱ्या सामान्य कामगार व नागरिकांना जीवनावश्यक घटक अन्नधान्य प्रवास शैक्षणिक खर्च, औषध उपचाराचा खर्च भागाविणे जीकिरीचे झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती त्वरित कमी कराव्यात, या मागणीसाठी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गतर्फे ०९ मे, २०२२ रोजी प्रांत कार्यालय कणकवली येथे धरणा आंदोलन करून कामगार आपला असंतोष प्रकट करतील, अशी माहिती भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव सत्यविजय जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची बैठक दिनांक २३ व २४ एप्रिल रोजी नाशिक येथे संपन्न झाली असता या बैठकीत वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. महागाईने सर्व सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. त्यावर राज्य व केंद्र सरकारने अंकुश लावावा. पेट्रोलीयम पदार्थ, अन्नधान्य, खाद्यतेल, स्वयंपाक गॅस, भाजी पाला या वस्तूंच्या किमती त्वरित कमी कराव्यात, या मागणीसाठी ०९ मे, २०२२ रोजी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारला जागे करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगाने ०९ मे, २०२२ रोजी प्रांत कार्यालय कणकवली समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली धरणा आंदोलन व निदर्शने करून शासनास निवेदन सादर करतील, अशी माहिती जिल्हा सचिव सत्यविजय जाधव व जिल्हा अध्यक्ष विकास गुरव यांनी दिली. या आंदोलनात कामगारांनी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे.