*कोकण Express*
*एस् टी बस पुर्ववत होण्यासाठी मेधांश काँम्पुटरच्या विद्यार्थ्यांची तळेरे बस स्थानक स्वच्छता मोहीम*
*तळेरे येथे एस्. टी. सेवेसाठी निवेदन देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर*
*कासार्डे ः संजय भोसले*
श्रावणी कंप्युटर तळेरे आणि मेधांश कंप्युटर कासार्डेच्या विद्यार्थ्यांनी एस्. टी. पूर्ववत चालू व्हावी यासाठी तळेरे एस्. टी. स्टँड येथे निवेदन दिले. तसेच तळेरे एस्. टी. स्टँड परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
खेड्यापाड्याला जोडणारी महाराष्ट्राची लालपरी सुमारे पाच महिन्यांपासून बंद आहे. कामगार, मजूर, नोकरवर्ग, वयोवृध्द, रुग्ण, विद्यार्थीवर्ग अशा प्रत्येक गोरगरिबाचे प्रवासाचे अतोनात हाल होत आहेत. प्रत्येकाला प्रवासासाठी आर्थिक चणचण भासत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कित्येकांना प्रवास भाडे परवडत नसल्याने स्वतःच्या पालकांपासून दूर – भाडेतत्त्वावर, पाहुणे मंडळींकडे राहावे लागते. प्रत्येकाचा मनी असलेल्या अशा अनेक व्यथा श्रावणी कंप्युटर तळेरे आणि मेधांश कंप्युटर कासार्डेच्या विद्यार्थ्यांनी एस्. टी. पूर्ववत चालू व्हावी यासाठी तळेरे एस्. टी. स्टँड येथे निवेदन देताना मांडल्या. शाळा, कॉलेज, इतर कोर्सेससाठी सकाळी घराबाहेर पडताना उन्हातान्हातून तहान भुकेने व्याकुळत संध्याकाळी घरी परतण्यासाठी किती वाजतील याबाबत पालक – विद्यार्थ्यांना शासंकता असते. तसेच आर्थिक चणचण असताना पोटापाण्याचे सुद्धा हाल होत आहेत. अशा अनेक व्यथा विद्यार्थ्यांनी मांडल्या. या व्यथा मांडताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी पियाळी, दाबगाव, कासार्डे, नांदगाव, दारुम, वारगाव, साळीस्ते, नडगिवे, चींचवली, खारेपाटण, नाधवडे , गवाणे, ओझरम, बुरंबावडे, नाद, शिरवली, मुटाट, पाळेकरवाडी, गोवळ, फणसगाव, बापर्डे इत्यादी गावामधील श्रावणी आणि मेधांश कंप्युटर मध्ये शिकत असलेले सुमारे ६० विद्यार्थी उपस्थित होते. नेहरू युवा केंद्र मार्फत आयोजित केलेल्या स्वच्छता श्रमदानामध्ये या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांनी एस्. टी. स्टँड परिसरात स्वच्छता श्रमदान करत आदर्श ठेवला आहे.
या प्रसंगी तळेरे एस्. टी. स्टँड व्यवस्थापक श्री. शेळके, माजी एस्. टी. कर्मचारी रविंद्र शिंगे, विनोद धुरी, प्रवीण वरूणकर, श्रावणी कंप्युटर आणि मेधांश कंप्युटरचे संचालक सतिश मदभावे, नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक रीना दुदवडकर, राहुल सोमले, प्रणाली मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्रावणी मदभावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.