*कोकण Express*
*“सिंधुरत्न” मधून ग्रामीण भागाप्रमाणे आता शहरातील महिला बचत गटही “बळकट” करणार…*
*पालिकेकडून त्यांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देणार…*
*दीपक केसरकर; सावंतवाडीसाठी आता रुग्णवाहिका, शववाहिनी व ६ बॅटरी ऑपरेटेड कार देणार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
ग्रामीण भागाप्रमाणे आता शहरातील महिला बचतगट सुद्धा “रत्नसिंधू” योजनेतून बळकट करण्यात येणार आहेत. पालिकेकडून त्यांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान शहरासाठी १ रुग्णवाहिका, १ शववाहिनी आणि ६ बॅटरी ऑपरेटेड कचरा गाड्या देण्यात येणार आहेत. तर शहरात येत्या मे महिन्यापासून पाणी टंचाई जाणवणार नाही. नव्या योजनेतून दीडपट पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख निधी खर्च करण्यात येणार आहे, असेही श्री.केसरकर यावेळी म्हणाले.
श्री. केसरकर यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेत महिला बचत गट व पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्री केसरकर पुढे म्हणाले, येत्या दोन ते तीन महिन्यात शहराचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. शहरातील विकास कामांसाठी साडेसहा ते सात कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून विविध विकास कामे आता मार्गी लागणार आहेत. यात शहराला भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये निधी खर्च होणार आहे. तर आमदार निधीतून पालिकेला १ रुग्णवाहिका, १ शववाहिका व सहा बॅटरी ऑपरेट कचरा गाड्या दिल्या जाणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
श्री.केसरकर पुढे म्हणाले, चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गट सक्षम करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र आता नव्याने आलेल्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत ग्रामीण भागासह शहरातील बचत गटांना सुद्धा तेवढेच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आठही नगरपालिकांना सोबत घेऊन शहरातील बचत गटांचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या मालकीच्या जागेत त्यांना विविध उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. तर सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक बळ दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.