*कोकण Express*
*सावंतवाडी कुटीर रुग्णालयाच्या शवागृहातील “फ्रीजर” दोन महिने बंद…*
*मनसे शहराध्यक्षांची नाराजी; आमदारांसह प्रशासनाने लक्ष द्यावे, मृत्यूनंतर कोणाची हेळसांड नको…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेली शवागृहातील फ्रीजर गेले दोन महिने बंद आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे मृतदेह ठेवण्यासाठी अन्य खासगी संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून रुग्णालयाला कार्पोरेट लुक देण्याच्या गोष्टी करणार्या स्थानिक आमदारांनी मरणानंतर मृतदेहाची अवहेलना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी माहीती दिली. ते म्हणाले, या ठिकाणी रुग्णालयाच्या शवागृहात असलेला फ्रीजर गेले दोन महिने बंद आहे. तसेच त्या शवागृहाची इमारत सुध्दा मोडकळीस आली आहे. याबाबची माहीती काही रुग्णांच्या नातेवाईकांकडुन मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जावून पाहणी केली. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उत्तम पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दोन महिने ही समस्या आहेत. हे खरे आहे. परंतु त्या इमारतीसह फ्रीजरचे काम करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत संबधित बांधकाम व रुग्णालय प्रशासनाने तात्काळ याबाबत योग्य ती भूमिका घेवून बंद असलेला फ्रीजर सुरू करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, अन्यथा मनसे आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.