*कोकण Express*
*बीएएमएस, एमएस डॉक्टरांना आता सर्जरीसाठी कायदेशीर संरक्षण ; नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
शल्य आणि शालाक्य या विषयातील बीएएमएस , एमएस ही पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांचे सर्जरीचे कायदेशीर अधिकार परिपूर्ण करण्यासाठीचे राजपत्र २० नोव्हेंबरला प्रकाशित झाले. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेज येथे शल्यतंत्र विषय शिकवणाऱ्या आणि धन्वंतरी पुरस्कार प्राप्त आयुर्वेद शल्य चिकित्सक डॉक्टर राजेश गुप्ता यांच्यासह ‘अस्तित्व परिषद’ या संघटनेचे सभासद तसेच शल्य, शालाक्य आणि स्त्रीरोग प्रसूति या विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने २५ नोव्हेंबर खासदार नारायण राणे यांची भेट घेत आभार मानले.
जागतिक आरोग्य संघटनेकडून घेण्यात आली दखल
दरम्यान, अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने देखील महाराष्ट्रातील या परिपूर्ण अॅक्ट दुरुस्तीची दखल घेत या डॉक्टरांना देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यासाठी शिष्टमंडळाने खासदार नारायण राणे यांचे आभार व्यक्त केले. या कायदेशीर लढाईमध्ये अस्तित्व परिषद, बी.जी.ए, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, वैद्यकीय विकास मंच, एटीए, टीएएस आणि आयुर्वेदाशी संबधित असलेल्या इतर सर्व संघटनांचा देखील मोठा हातभार लागला आहे. महाराष्ट्रातील MCIM आणि केंद्रीय स्तरावर सर्वोच्च स्थानी असलेल्या CCIM या महत्वाच्या संस्थांनी पाठपुरावा करून त्याला केंद्रीय स्तरावर कायद्याच्या चौकटीत राहून परिपूर्णता देण्याचे काम केले. या सर्व कार्याला खासदार नारायण राणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये शल्य व शालाक्यतंत्र या विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केलेले वैद्यकीय व्यवसायिक कायदेशीररित्या शल्यचिकित्सा अर्थात ऑपरेशन्स करत होते. मात्र या विधेयकामुळे त्यांना देशपातळीवर कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. आता शल्य आणि शालाक्य या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या पॅथीमधील ५८ ऑपरेशन करण्याची मुभा कायद्याने मिळाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत सर्व बी.ए.एम.एस शल्य व शालाक्यतंत्र या विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बीएएमएस पदव्युत्तर पदवी प्राप्त अनेक व्यावसायिक खेड्यापाड्यांमध्ये उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांना आरोग्य व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे भारतात जाणवणारी डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास नक्कीच मदत मिळेल. महाराष्ट्रात वेळोवेळी निघालेल्या GR, नोटिफिकेशन्स आणि २०१४ सालात झालेल्या अॅक्ट दुरुस्ती यांच्या आधारे शल्य आणि शालाक्य विषयातील पोस्ट ग्रॅज्यूएट डॉक्टर्सना सर्जरीचे अधिकार या पूर्वीच मिळाले होते. मात्र आता केंद्र सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे हे पदव्युत्तर पदवी धारक अधिक आत्मविश्वासपूर्वक केंद्र सरकारने नमूद केलेल्या ५८सर्जरी करू शकतील व याचा खेडोपाड्यातील गरीब जनतेला नक्कीच फायदा होईल असा विश्वास डॉक्टर राजेश गुप्ता यांनी व्यक्त केला. यावेळी इतर काही शाखांमधील अपूर्ण तरतुदी पूर्ण करण्याच्या कामी लक्ष घालून त्यांचेही कायदेशीर अधिकार लवकरात लवकर मिळावे यासाठी शिष्टमंडळाच्या वतीने डॉ राजेश गुप्ता आणि अस्तित्व परिषदेचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी खासदार नारायण राणे यांना विनंती केली. दिल्लीमध्ये गेल्यावर आपण जातिनिशी या कामात लक्ष घालून आवश्यक मदत नक्की करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अस्तित्व परिषदेच्या शिष्टमंडळाच्यावतीने डॉ. राजेश गुप्ता, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. गुरु गणपत्ये, डॉ. गुरुप्रसाद सवदत्ती, डॉ.नरेंद्र लेले, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, डॉ. कौस्तुभ पारकर, डॉ. ऋचा कुलकर्णी, डॉ. मनीषा नारकर आणि डॉ. गौरी गणपत्ये हे उपस्थित होते