*कोकण Express*
*जिल्ह्यातील मटका व्यवसायावर कठोर कारवाई करा*
*माजी खासदार निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोकाळलेल्या मटका व्यवसायावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि युवापिढी बरबाद होण्यापासून वाचवावी असे आवाहन माजी खासदार आणि भाजप प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केले आहे. यासंदर्भात एक पत्र त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
निलेश राणे आपल्या पत्रात म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात अनधिकृत मटका व्यवसायाला उत आलेला आहे . या जुगार मटका व्यवसायाच्या विळख्यात तरुण पिढी बरबाद होत असून अशा धंद्यांवर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालणाऱ्या या अनधिकृत मटका व्यवसायामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव बदनाम होत असून कित्येक संसार रस्त्यावर आले आहेत.ग्रामीण भागातील महिला अश्या धंद्यामुळे त्रस्त असून पोलीस प्रशासनाचे या अनधिकृत व्यवसायावर नियंत्रण राहिलेलं नाही . जर हा प्रकार वेळीच थांबला नाही तर त्याचे गंभीर परिमाण हे समाजाला भोगावे लागतील, त्यामुळे आपण या प्रकरणाची आपण तातडीने दखल घेऊन अश्या अनधिकृत धंद्यांचा शोध घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून चालढकल अथवा दिरंगाई होत असल्यास आम्ही स्वतः प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना घेऊन जिल्ह्यातील अशा प्रकरणांची माहिती सार्वजनिक करू याची नोंद घ्यावी, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.