*कोकण Express*
*कवितेच्या स्व प्रेमातून बाहेर पडलो तरच चांगल्या कवितेची निर्मिती शक्य*
*कणकवली महाविद्यालयाच्या साहित्य कार्यशाळेत कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन*
*कार्यशाळेला जिल्ह्याभरातून उस्फुर्त प्रतिसाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पुस्तकातील जगण्यापेक्षा वास्तवातील जगणे महत्त्वाचे असते. कवी आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहिला तरच त्याला सजगपणे पुस्तकांबरोबर माणसंही वाचता येतात. कवी आणि भोवताल यांचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जायला हवे.बदलत्या कठोर वास्तवाचे चिंतन कवी करत नसेल तर तो कवी म्हणून त्या काळात पराभूतच होत असतो.म्हणून उत्तम कवितेच्या निर्मितीसाठी कवीला या सगळ्याचे भान असणे आवश्यक असते.मात्र कवी ‘स्व’ च्या प्रेमातून बाहेर पडला तरच हे शक्य आहे. लेखक, कवीला आपले व्यक्तिगत अनुभव सुद्धा सार्वत्रिक स्वरूपात मांडता आले पाहिजेत,असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी कणकवली महाविद्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यशाळेत केले.
कणकवली महाविद्यालयाच्या कनक विभागातर्फे आयोजिलेल्या या कार्यशाळेतील ‘कवितेची निर्मिती प्रक्रिया’ हे सत्र प्रा.अनिल फरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवी कांडर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाले.यावेळी अधिक भाष्य करताना कांडर यांनी तटस्थपणे कवितेच्या निर्मिती प्रक्रियेकडे पाहिले पाहिजे. साहित्याच्या वेगवेगळ्या परंपरेचे वाचन व चिंतन जेवढे अधिक प्रमाणात होईल तेवढी दर्जेदार कविता निर्मिती होते.असेही आग्रहाने सांगितले.
या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त डॉ.राजश्री साळुंखे, प्राचार्य डॉ राजेंद्रकुमार चौगुले, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ. सोमनाथ कदम, प्रा.डॉ.लालासाहेब घोरपडे, प्रा.डॉ.बाळकृष्ण गावडे, प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर,डॉ.भिकाजी कांबळे, प्रा. सीमा हडकर, प्रा.मीना महाडेश्वर
आदी उपस्थित होते.
कवी कांडर म्हणाले, कवितेची निर्मिती प्रक्रिया उस्फुर्त होत असली तरी कवीला कवितेचे अनेकवेळा पुनर्लेखन करावेच लागते.तसे झाले नाही तर कवितेच्या सौंदर्याचा तोल बिघडतो.मग पद्य आणि गद्य यात फरक राहत नाही. ज्यांनी कवितेच पुनर्लेखन नाकारल ते कवी मोठे होऊ शकले नाहीत.मंगेश पाडगावकर यांच्या सारखे कवी एक कविता दहा ते बारा वेळा लिहायचे. माझ्या आगामी काळात प्रसिद्ध होणाऱ्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या 60 पानी दीर्घ कवितेचे मी आठ वेळा लेखन केले.
प्रा.फारकटे म्हणाले, कवी कांडर यांनी कवितेच्या निर्मिती प्रक्रिये विषयी अतिशय विस्ताराने मांडणी केली.अनेक नवे मुद्दे त्यात होते.सतत वाचन, चिंतन या गोष्टी महत्त्वाच्या असतातच पण ध्यास घेतल्या शिवाय उत्तम साहित्य लेखन करता येत नाही.
डॉ सोमनाथ कदम यांनी स्वागत केले, सुत्रसंचलन प्रा.मीना महाडेश्वर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.भिकाजी कांबळे यांनी मानले.