*कोकण Express*
*कासार्डे येथील ज्ञानमंदिर वाचनालयाचे ग्रंथ प्रदर्शन*
*मराठी भाषा पंधरवडानिमीत्त आयोजन : असंख्य वाचकांची प्रदर्शनाला भेट*
*कासार्डे संजय भोसले*
कासार्डे येथील ज्ञानमंदिर वाचनालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमीत्त वाचनालयातील नवीन जुनी अनमोल ग्रंथ संपदाचे प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनाला शालेय मुलांनी भेट दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक मुद्राळे, दिवाकर पवार, ग्रंथालयाचे कार्यवाह अविनाश सावंत व ग्रंथापाल सौ अक्षता सावंत, सौ स्वाती तेली व विद्यार्थी उपस्थित होते.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे वाचनालये बंद होती. त्यामुळे आपल्या वाचनालयात नेमकी कोणत्याप्रकारची ग्रंथ संपदा उपलब्ध आहे हे समजावे आणि पुनश्च या ग्रंथांच्या सहवासात वाचक यावेत यासाठी विविध भाषेतील दर्जेदार पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
मराठी, मायबोलीतून घेतलेले ज्ञान हे सहजतेने प्राप्त होते. कारण शिकत असताना आजुबाजुला असलेल्या गोष्टींशी साधर्म्य लावता येते. घेतलेले ज्ञान मनावर ठसते. आपली मराठी सम्रुद्ध असून देखील इतर भाषांचे फाजील अतिक्रमण, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश यासारख्या बाबींमुळे आज मराठी भाषा संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
ग्रंथ प्रदर्शनाला कासार्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.