*कोकण Express*
*वीजबिल माफीसाठी २६ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…*
*मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गात २६ नोव्हेंबरला सकाळी साडे दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. तर वीजबिल माफी देण्यास काँग्रेस तयार आहे. मात्र याचे श्रेय काँग्रेस पक्षाला मिळू नये यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून वीजबिलमाफीबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.
श्री.उपरकर म्हणाले. वाढीव विजबिलामुळे जनता त्रस्त झाली आहे. या बिलातून कुणाचीच सुटका झालेली नाही. इंदिरा आवास घरात दीड युनिट वीज पुरवठा असताना ५ हजार रुपये बिल देऊन सरकारने शॉक दिला आहे. मध्यम वर्गीय जनता हैराण झाली आहे. वीजबिल थकीत राहिल्याने जर कुणाचे मीटर कापण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले तर मनसे कार्यकर्ते जनतेच्या पाठीशी राहणार आहेत. मनसेच्या मोर्चात जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे. सर्वसामान्य लोकांची वाढलेली बिले असताना मोठ्या उद्योजक यांना मात्र सूट देण्याची योजना शासनाने आणली, असा आरोपही उपरकर यांनी केला.
राज ठाकरे यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन वीज बिल माफ करण्याची मागणी केली असता राज्यपाल यांनी शरद पवार यांचे नाव सांगितले. त्यानंतर श्री.ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र बिलाचा प्रश्न सुटलेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी बिल माफी करण्यास तयार नाहीत. तीन पक्षाच्या वादात जनता होरपळत असल्याचा आरोपही श्री.उपरकर यांनी केला.