*कोकण Express*
*वाळके कुटुंबीयांनी ८ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण नारळपाणी घेऊन सोडले*
*मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम परवानगीचे दिले पत्र*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायत हद्दीतील मिळकतीमध्ये बांधकाम परवानगीसाठी माजी नगरसेवक उमेश वाळके कुटुंबीयांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या ८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु होते.आज गुरुवारी सायंकाळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी त्यांना बांधकामाची परवानागीचे पत्र दिले.त्यानंतर शिवसेना नेते संदेश पारकर व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी उमेश वाळके यांच्यासह कुटुंबीयांना नारळपाणी दिल्यानंतर वाळके कुटुंबीयांनी उपोषण सोडले.
कणकवली नगरपंचायत हद्दीतील मिळकतीमध्ये बांधकाम करण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रजासत्ताक दिनापासून उमेश वाळके यांनी कुटुंबीयांसह प्राताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते . उपोषणाच्या आठव्या दिवशी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व नेतेमंडळींनी व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी त्यांची भेट घेतली होती . यावेळी श्री.वाळके व मुख्याधिकारी श्री.तावडे यांच्यात झालेल्या चर्चेअंती रेल्वेच्या प्रशासनाकडून एनओसी मिळल्यानंतरच बांधकाम प्रत्यक्षात सुरू करू असे प्रतिज्ञापत्र श्री. वाळके यांनी दिल्यानंतरच बांधकामाची परवानगी देणार असल्याचे श्री . तावडे यांनी आश्वासन दिले होते त्यानंतर श्री.वाळके यांनी प्रतिज्ञापत्र नगरपंचायतीला दिले . गुरुवारी मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम परवानगीचे पत्र दिल्यानंतर वाळके कुटुंबीयांनी उपोषण सोडले . यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर,रूपेश नार्वेकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,श्री. तळगावकर, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान,सीईओंनी बांधकाम परवानगीचे पत्र उमेश वाळके यांना दिल्यानंतर सोहम वाळके व सुलभा वाळके यांनी फटाके फोडत,पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत अखेर सत्याचा विजय होवून न्याय मिळाला.असे उद्गार काढले. बांधकाम परवानगी मिळण्यासाठी उमेश वाळके कुटुंबीयांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या संदर्भात आपण व आमदार वैभव नाईक यांनी नगरविकासमंत्री एकानाथ शिंदे यांची भेट घेत या विषयाची सविस्तर माहिती दिली होती . मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्याधिकारी श्री.तावडे यांना फोनद्वारे संपर्क करून बांधकाम परवानागी देण्याची आदेश होते.
नगरसेवक रवींद्र गायकवाड व त्यांचे भाऊ तथा न.पं.कर्मचारी प्रवीण गायकवाड यांनी स्वतःच्या घराचा तळमजला व एक मजल्याचे बांधकाम अनधिकृत केले आहे.याबाबतही कार्यवाही व्हावी,अशी मागणी आपण मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे केली होती. या बाबतबआठ दिवसांत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. तावडे यांनी दिल्याचे श्री . वाळके यांनी सांगून या संदर्भात आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आरक्षण टाकण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या जोरावर घेतला .या ठरावाला विरोधी गटाच्या नगरसेविकांनी विरोध दर्शवला होता आज ज्या अर्थी उपोषणकर्ते वाळके कुटुंबीयांना बांधकाम परवानगी मिळाली त्या अर्थी तो ठराव चुकीचा होता हे सिद्ध झाले आहे.यामुळे आम्ही केलेला विरोध हा सत्याच्या बाजूने होता.तसेच न.पं.मध्ये अशाप्रकारे चुकीचे ठराव घेतल्यास यापूर्ढे ही आम्ही विरोध करू,असा इशारा माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर व रुपेश नार्वेकर यांनी दिला.