*कोकण Express*
*दोडामार्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पक्ष स्वीकारणार नाही…*
*पुन्हा नवी जबाबदारी सोपविणार ;अर्चना घारे…*
*दोडामार्ग ः लवू परब*
येथील नगरपंचायत निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारीतून दिलेले राजीनामे पक्षाच्या माध्यमातून स्विकारले जाणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे यांनी दिली. दरम्यान याबाबत आपण जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी देखील चर्चा केली असून उलट त्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल पक्षाच्यावतीने त्यांचे कौतुक केले जाईल, तर पुढील निवडणुकांमध्ये त्यांच्याकडे नवीन जबाबदारी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत सौ.घारे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन येथील नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे देत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांनी दिल्लीश्वरांच्या विरोधात दिलेला लढा कौतुकास्पद आहे. काही जागांवर तर केवळ नशिबाने आमच्या उमेदवारांना हार मिळाली आहे. त्यामुळे त्या पदाधिकार्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत. उलट त्यांनी दिलेल्या या लढ्याबद्दल त्यांचे पक्षातर्फे कौतुक केले जाईल, आणि पुढील निवडणुकांमध्ये त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले.