*कोकण Express*
*सावंतवाडी पोस्ट कार्यालयाच्या विरोधात २६ जानेवारीला पुकारलेले आंदोलन स्थगित…*
*सुरेश भोगटे; ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे पोस्ट अधीक्षक अभियंतांचे लेखी आश्वासन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील पोस्ट कार्यालयात ग्राहकांना कर्मचार्यांकडून चांगली सेवा मिळत नसल्यामुळे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी २६ जानेवारीला पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. श्री.भोगटे यांनी पोस्ट व्यवस्थापकांना याबाबत जाब विचारल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता व एएसपी पोस्ट उपअधीक्षक यांनी सावंतवाडी पोस्ट कार्यालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी यापुढे ग्राहकांना चांगली सेवा दिली जाईल, असे लेखी आश्वासन त्यांनी श्री.भोगटे यांना दिले. त्यानंतर श्री.भोगटे यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, १५ जानेवारीला श्री.भोगटे हे कुरियर करण्यासाठी पोस्ट मध्ये गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून उर्मट तसेच असभ्य वागणूक देण्यात आली होती. या प्रकारानंतर श्री.भोगटे यांनी पोस्टमास्टर एस.पी.कंसपले यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले. व त्यांच्यासमोर पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीची लक्तरे उघडी केली. यानंतर संबंधित चुकीची वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी श्री.भोगटे यांची माफीही मागितली होती. यानंतर या प्रकाराची दाखल अधीक्षक अभियंता ओरोस यांनी घेत येथील पोस्ट कार्यालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली तसेच त्यानंतर ग्राहकांना चांगली सेवा देण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे आपण २६ जानेवारीला पोस्ट प्रशासनाच्या विरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित करत आहे, असे म्हटले आहे.