*कोकण Express*
*कणकवली नगरपंचायतचा ‘तो’ रस्ता अडवला*
*कणकवली : मयूर ठाकूर*
कणकवली शहरातील नागवे रोड जवळील रवळनाथ मंदिर ते मनोहर राणे यांच्या घरापर्यंत रस्ता हा आज स्थानिक नागरिकांनी चीर्याचे कुंपण करून अडवत फक्त पायवाट ठेवली आहे. त्यामुळे या अडवलेल्या रस्त्यामुळे सर्वच नागरिकांची जाण्या येण्यासाठी मोठी गैरसोय होणार आहे.
कणकवली शहरातील बरेच छोटे-मोठे रस्ते बनवण्याचे काम हे नगरपंचायतीने हाती घेतले आहे. पण मागील 15 ते 16 वर्षे प्रलंबित असलेला नागवे रोड ते मनोहर राणे यांच्या घरापर्यंतचा हा रस्ता नगरपंचायतने करण्यासाठी हाती घेतला होता. पण तेथील नागरिक यांनी हा रस्ता आपल्या जमिनीत असल्याने आपला या रस्त्याला विरोध असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली. त्याच्यावर नगरपंचायतने आपली बाजू मांडून तो रस्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर अजून कोणताही निर्णय न झाल्याने स्थानिक रहिवासी याना जाण्यासाठी वाटच उपलब्ध नसल्याने स्थानिक रहिवाशी यांनी नगरपंचायत प्रशासन, तहसीलदार, प्रांताधिकारी, कणकवली पोलिस स्टेशन यांना निवेदन सादर करत आम्हाला रस्ता खुला करून द्यावा अशी विनंती केली होती. त्यावर नगरपंचायत ने तात्पुरत्या स्वरूपात येऊन मोजणी केली. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न केल्याने प्रशासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिक रहिवासी यांनी आज हताश होत हा 100 मीटर चा रस्ता चीर्याचे कुंपण घालून रस्ता बंद करून तात्पुरती पायवाट ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.