कुडाळात भाजपाला समन्वयाचा “अभाव”च नडला…! बंडखोरीच्या शेपटाचा तडाखा अखेर बसलाच!!

कुडाळात भाजपाला समन्वयाचा “अभाव”च नडला…! बंडखोरीच्या शेपटाचा तडाखा अखेर बसलाच!!

*कोकण  Express*

*कुडाळात भाजपाला समन्वयाचा “अभाव”च नडला…! बंडखोरीच्या शेपटाचा तडाखा अखेर बसलाच!!*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

काही दिवसांपूर्वी जेव्हा मी भाजपाच्या राजकारणावर जाहीरपणे बोललो होतो, तेव्हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळाने नाराजी व्यक्त केली होती. माझ्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा विचारही झाला, पण तिथेही समन्वयाचा अभाव असल्याने त्यावरही पुढे काहीच निर्णय झाला नाही. प्रश्न माझ्यावरच्या कारवाईचा कधीच नव्हता, आम्ही अटलबिहारी वाजपेयींची तत्वनिष्ठा आणि नरेंद्र मोदींच्या आक्रमक राष्ट्रप्रेमाच्या पालखीचे भोई! आमचे पाय कोण छाटण्याचा प्रयत्न करतोय यापेक्षा मोदी-विचारांची पालखी वेगाने कशी पुढे जाईल हेच पाहणार. आमची जाहीर मुलाखत तात्त्विकदृष्ट्या चुकीची की गैरशिस्तीची यावर खल करण्यापेक्षा त्यातून बोध घेतला असता तर “ती” वेळ कदाचीत आजचा निकाल बदलणारी ठरू शकली असती.

माझ्या मुलाखतीत मी मांडलेला मुद्दा नंतर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीच सिद्ध केला. त्यांनी आधी दिलेला आणि मग कोणावर राग नसल्याचे सांगत पाठी घेतलेला राजीनामा हा समन्वयाच्या अभावाचाच परिपाक होता. ही धाव घेण्यासाठी त्यांना कोणी चुकीचा “कॉल” दिला होता नाहीत नाही. फक्त अंपायर चंद्रकांतदादा पाटील यांनी थर्ड अंपायर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत बोट वर न करण्याचा निर्णय घेतल्याने राजन तेली परत क्रिझवर परतले आहेत. आता ते धावून रन्स काढण्याचा विचार करतील असे वाटत नाही, स्कोअर होवो किंवा नको होवो. समन्वयाचा हाच अभाव भाजपाला मोठ्या धावसंख्येपासून रोखेल, आणि या नगरपंचायत निवडणुकीत नेमके हेच झाले आहे.

कोणाला बरे वाटो किंवा वाईट, पण सत्य हे सत्यच असते. आणि सुधारणा घडवून आणायची असेल तर सत्य पचवावे लागते. कुडाळला निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपासाठी जे पोषक वातावरण होते, ते पाहता विरोधकांना उमेदवार तरी मिळतील का अशी स्थिती होती. पण निवडणुकीची यादी जाहीर झाली आणि नंतर जी बंडखोरी झाली, त्यातून विरोधकांना मजबूत बळ मिळाले. आज केवळ एका सीटचा सेटबॅक बसल्याने समन्वयाचा अभाव नसण्याची किंमत पक्षाला मोजावी लागत आहे.

कुडाळमध्ये ज्यांनी बंडखोरी केली, त्यामध्ये अनिल उर्फ बंड्या सावंत हे संघाचे कार्यकर्ते व भाजपाचे जिल्हा चिटणीस, त्यांच्या पत्नी अदिती या जिल्हा महिला मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकारी! दुसरे बंडखोर सुनील बांदेकर हे माजी नगरसेवक, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य. अन्य बंडखोर उमेदवार सौ ममता धुरी या भाजपाच्या कुडाळ शहराध्यक्ष! कुडाळ तालुका सरचिटणीस आणि जवळपास तीस वर्षे सगळ्या बऱ्यावाईट परिस्थितीत भाजपाचा झेंडा नाचवणारे विजय कांबळी यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने लोकांमध्येही चुकीचा संदेश गेला होताच. इथेही समन्वयाचा मोठा अभावच आडवा आला. यातील कोणालाही विश्वासात घेऊन सांगितले असते की तुम्ही निवडणूक लढवायची नाहीय, तरीही बंडखोरी झालीच नसती. बंड्या सावंत हे अतुल काळसेकर यांचे मित्र तथा एकनिष्ठ समर्थक म्हणून गेली अनेक वर्षे प्रसिद्ध आहेत. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचेही कुडाळात त्यांच्याशिवाय पान हलत नाही. मग त्यांना विश्वासात घेण्याची जबाबदारी काळसेकर-तेली यांना अवजड का ठरली? चेतन धुरी आणि ममता धुरी यांना आमदार रविंद्र चव्हाण नेहमीच आदरस्थानी. मग यावेळी रविंद्र चव्हाण यांनाही शब्द टाकणे नैतिकदृष्ट्या का अडचणीचे ठरले? सुनील बांदेकर हे तर आजवर राणे परिवाराचे विश्वासू सदस्य मानले जात. मग असे काय घडले की बांदेकर यांनाही राणेंच्या भेटीला जाणे अयोग्य वाटले. प्रश्न कडवट असतील पण उत्तरे शोधावीच लागतील. विजय कांबळी यांना हिरवा कंदील मिळाला होता, त्यांनी प्रचाराच्या दोन फेऱ्याही पूर्ण केल्या होत्या. त्यांना विश्वासात न घेता तिकीट कापल्याने त्यांच्या डोळ्यातून ओघळलेली आसवे पुऱ्या प्रभागाने पाहिली. मी पक्षशिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. मला तिकीट द्यायचे नसेल तर देऊ नका, पण मला निदान विश्वासात घेऊन तशी कल्पना द्यायला हवी होती. माझी पक्षातली किंमत तरी लोकांसाठी बंद मुठीतली राहिली असती, हे त्यांचे म्हणणे चुकीचे कसे? किंबहुना, रविंद्र चव्हाण यांच्या शब्दाखातर भाजपाच्या माजी नगरसेविका उषाताई आठल्ये पक्षाच्या प्रचाराला बाहेर पडल्या हे खरे असले तरीही पक्षाचे अधिकृत तिकीट पक्षकार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे कारण देत त्यांनी नाकारले, त्या दरम्यान नेत्यांचे शब्द त्यांच्यापर्यंत वेळात का पोहोचले नाहीत? समन्वयाचा अभाव सिद्ध करायला आणखी किती दाखले द्यायचे?

यात वाईट वाटते ते पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ताकद पणाला लावणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांचे. आजवर शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कुडाळमधला भाजपाचा विरोध हा चांगल्या समन्वयाचे उदाहरण ठरत होते. राज्यात युती तुटल्यावर इथे असलेल्या बाबा मोंडकर या आपल्या उमेदवाराला केवळ टिळा लावुन तबक वैभव नाईक यांनाच ओवाळले गेले होते. आजही जुने अनेक रेशीमधागे त्याच प्रेमात गुंतून आहेत. पण निलेश राणे यांचे राजकारण हे सरळसोट असते. त्यात छक्केपंजे नाहीत. त्यामुळे आता भाजपा म्हणून खरे आव्हान निलेश राणेच वैभव नाईक यांच्यासमोर उभे करू शकतात हे वास्तव आहे. त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता येणे गरजेचे होते. त्यातून आजच योग्य तो मेसेज गेला असता. तशीही, पक्षासाठी सांगाल तिथे सांगाल तशी ताकद लावण्याची धमक याच युवा नेत्यात आहे. अशावेळी यादी जाहीर होण्यापासून निवडणूक प्रचार यंत्रणेपर्यंत त्यांच्याबद्दल गैरसमज व्हावेत अशा पद्धतीने अनेकवेळा यंत्रणा विस्कळीत कशी आणि का झाली? याचे उत्तर आजच शोधले पाहिजे. आजउद्या, कुडाळच्या राजकीय पार्श्वभूमीवर कदाचित मलमपट्टीचा “चमत्कार” घडेलही. घोडेबाजाराचे राजकारण आज कोणालाच नवीन उरलेले नाही. आजच्या राजकीय तडजोडीत कोणाला गाढवही महत्वाचे उरलेले नाही आणि ब्रह्मचर्यही गरजेचे राहिले नाही. पण हा काही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भाजपाचा गाभा नाही. तडजोडीचे राजकीय सूर्य कितीही चमकले तरी तत्वाच्या तेलावर जळणाऱ्या सगळ्याच पणत्या काही विझल्या आहेत असेही नाही. अंधाराला मांगल्याचे आव्हान देत जळणाऱ्या पणत्याही फार मोलाच्या असतात. फक्त त्यांचे मोल कळण्याएवढा अंधार पडू नये असे स्वतः त्या पणत्यांनाही वाटत असते.

त्या पणत्या आणि सूर्य यांच्यात तरी या वाटण्याच्या बाबतीत समन्वय असणार की नाही हाच प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!