*कोकण Express*
*शाळा बंदचा निर्णया विद्यार्थ्यांना अधोगतीकडे नेणारा ; श्री.वामन तर्फे*
*सिंधुदुर्ग*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड वर्ष मुले शाळेच्या बाहेर राहीली. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर शासनाने सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. बऱ्याच काळानंतर आता कुठे मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत होती. लेखन, वाचनात रस घेत होती. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितिवर गंभीर परिणाम झालेले होते. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांना अथक परिश्रम घ्यावे लागले. मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी अधोगतीकडे जातील अशी भीती निर्माण झाली आहे असे मत सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे आणि सचिव श्री.गुरुदास कुसगांवकर यांनी व्यक्त केले.
ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी नेटवर्क आणि फोनच्या अभावामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहतो. ही शिक्षणातील असमानता नाही का? ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम जाणवत नाही याची जाणीव शिक्षकांना झालेली आहे. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणाला पर्याय ग्रामीण भागात नाही. मार्च 2020पासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची लेखन, वाचन आणि आकलन क्षमता कमी झाली. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थी मोबाईलरुपी व्यसनाच्या आहारी गेला. काही मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेली. मुले असंस्कारक्षम राहीली. असे अनेक दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांवर झाले.
शैक्षणिक दरी निर्माण झाली. शैक्षणिक गुणवत्ता ढासळली. ही दरी कशी आणि कधी भरुन निघणार? पालक, समाज, विद्यार्थी, शिक्षक शिक्षणप्रेमी यांनाही इतर बाबी सुरू असताना सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय रुचलेला नाही.
सरसकट शाळा बंद करण्याऐवजी शाळा सुरू करताना शासनाने सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन जशी पालक, व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक प्रशासन यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली होती. तशी ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा भागात सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित करुन शाळा सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी होती. शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करुन विद्यार्थ्यांची 50%उपस्थिती, एकदिवस आड शाळा, कमी वेळ शाळा, गटा-गटाने शाळा या पर्यायांचा अवलंब करून शाळा सुरू ठेऊन ऑफलाईन शिक्षणाला परवानगी द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे आणि सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने केली आहे.