*कोकण Express*
*सुशांत नाईक यांची युवासेना जिल्हाप्रमुख पदी निवड*
*नाईक यांना जिल्हा बँकेच्या यशाची मुख्यमंत्र्यांकडून पोचपावती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी माजी आमदार राजन तेली यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवणाऱ्या शिवसेनेचे कणकवलीचे नगरसेवक व नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक याची युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली आहे. शिवसेनेतील युवा चेहरा म्हणून सुशांत नाईक यांची ओळख आहे. त्यातच राजन तेली यांच्या सारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून सुशांत नाईक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना शिवसेनेकडून यशाची पोचपावती दिल्याचे बोलले जात आहे. सुशांत नाईक हे स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे सुपुत्र असून आमदार वैभव नाईक यांचे ते बंधू आहेत. त्यातच शिवसेनेमध्ये पक्ष संघटना वाढीतही त्यांचा मोठा सहभाग आहे. कणकवली शहर मर्यादित राजकारणात असलेले सुशात नाईक यांनी जिल्हा बँकेत विजयश्री संपादन केल्यानंतर सुशांत नाईक यांची आता शिवसेनेच्या जिल्हास्तरीय पदावर निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. सुशांत नाईक यांची ही निवड कणकवली विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकीय वाटचालीची नांदी समजली जात आहे. तसेच युवासेना जिल्हा समन्वयक म्हणून गितेश कडू यांची निवड करण्यात आली आहे.
