अपवादात्मक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे योग्य

अपवादात्मक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे योग्य

*कोकण  Express*

◼️ *अपवादात्मक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे योग्य*

◼️ *पत्रकार संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्कार सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन*

◼️ *मराठी-,कन्नड साहित्याच्या अभ्यासक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांचा कबीर पुरस्काराने गौरव*

*कणकवली/प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत कार्यरत राहिलेल्या आणि परिवर्तन चळवळीला जोडून घेऊन सामाजिक कामातही योगदान देणाऱ्या संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या कबीर पुरस्काराने मराठी आणि कन्नड साहित्याच्या दुवा ठरलेल्या प्राचार्य डॉ शोभा नाईक यांचा गौरव करण्यात आला ही मराठी साहित्यातील उचित अशी
घटना आहे. अपवादात्मक चांगलं काम करणाऱ्या डॉ. नाईक यांच्यासारख्या विदुषीचा सन्मान करणे म्हणजे कबीर पुरस्काराचीच उंची वाढविणे होय. साहित्य चळवळीत गंभीरपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या अशा व्यक्तींचा शोध घेऊन कामाची दखल घेणे म्हणजेच खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ पुढे जाणे असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.
संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्कार सोहळा बेळगांव लोकमान्य सभागृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी बोलताना कांडर यांनी प्रत्येक क्षणात कसोटीवर उतरावं लागणाऱ्या या काळात आपल्याशीच आपण प्रामाणिक राहिलो नाही तर उत्तम लेखन करू शकणार नाही. अशा प्रामाणिक राहणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींपैकी डॉ.नाईक असल्यामुळे मराठी साहित्याला स्वतंत्र योगदान देणार लेखन त्या करू शकल्या असही आग्रहाने सांगितले. लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते कॉ.संपत देसाई, सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या सदर पुरस्काराने कवी कांडर यांच्या हस्ते डॉ. नाईक यांना गौरवण्यात आले.यावेळी पुरस्कार योजनेच्या संयोजक नीलम यादव कांबळे, अनार्य कांबळे, सौ प्रज्ञा मातोंडकर, सौ मनीषा देसाई ,आदी उपस्थित होते.
कॉ.देसाई म्हणाले, संजय कांबळे हे परिवर्तन चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते होते. सावंतवाडीत भरलेले अ.भा. विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. अशा व्यक्तीच्या नावाने देण्यात येणाऱ्या कबीर पुरस्काराने डॉ. नाईक यांना सन्मानित करण्यात आले ही आनंदाची गोष्ट आहे. साहित्यिकाने आता चळवळीत काम करणार्‍या लोकांना पाठबळ देऊन व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याची गरज आहे.श्री मातोंडकर म्हणाले, एकाच वेळी मराठी -कन्नड या दोन्ही भाषेमध्ये सातत्याने अनेक वर्षे स्वतंत्र आणि अनुवाद लेखन करून डॉ. नाईक यांनी वाचकांचे आणि मराठी-कन्नड साहित्याचे सृजन जागते ठेवले. पर्यायाने बेळगावातील गंभीर लेखन चळवळ अव्याहतपणे हलती ठेवण्याचे मोठे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना मिळालेला संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्कार ही महत्वपूर्ण अशी घटना आहे.
प्राचार्य डॉ. शोभा नाईक म्हणाल्या, बेळगाव सारख्या भागात एकाच वेळी मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी आणि ग्रामीण भागातील बोली अशा भाषा बोलल्या जातात. भाषा जिवंत ठेवण्यासाठी हे भाषेचे एकमेकात मिसळणं मला फार महत्त्वाचं वाटतं आणि याच भाषेच्या प्रभावातून मी आजवर साहित्यलेखन करत आले. या कामाची दखल घेऊन संजय कांबळे सारख्या लढाऊ कार्यकर्त्याच्या नावाने दिला जाणारा कबीर पुरस्कार मला देण्यात आला याचा आनंद तर होत आहेच परंतु कांबळे यांचा परिवार हे मौलिक काम करत आहे याचं कौतुक वाटतं. आपणही समाजाला जोडून राहायला हवे, या भावनेतून या पुरस्काराची रक्कम मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी देत आहे!
प्रास्ताविक नीलम यादव कांबळे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.गावडे यांनी केले. कार्यक्रमाला माजी आमदार परशुराम नंदीहळी, ऍड राम आपटे समाजसेवक शिवाजी कागणीकर, विठ्ठल याळगी, अशोक देशपांडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!