*कोकण Express*
*पोलीस कर्मचारी भूषण सुतार यांचे मानवतावादी तत्व… कातकरी विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पोलीस, कायद्याचे रक्षक तसेच कडक शिस्त असणारे आणि काही चुकीचं घडलं तर कडक शिक्षा करणारे म्हणून त्यांचा दरारा सगळीकडे जाणवतो. परंतु हे पोलीस वरून जरी कठोर दिसत असले तरी या खाकी वर्दीखाली एक माणूस असतो आणि त्याच्यातही माणुसकी असते, हे अनेकदा दिसून येतं. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा दिसून आला. सिंधुदुर्ग पोलीस दलातील कर्मचारी आणि सध्या कणकवली डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेले भूषण सुतार यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवत शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कातकरी समाजातील दोन मुलांचा सारा शैक्षणिक खर्च उचलला आहे. पोलीस दलाच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याला जागत त्यांनी या मुलांच्या भविष्याला वाचविण्यासाठी त्यांच्यासमोरील आर्थिक संकटाचा प्रश्न दूर केला आहे. जोपर्यंत या मुलांना शिक्षण घ्यायचं आहे, तोपर्यंत या मुलांचे शैक्षणिक पालकत्व आपण स्वीकारत असल्याचे भूषण सुतार यांनी सांगितले आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोसावी यांच्यासह इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.
संजय पिंट्या निकम (इयत्ता पहिली) आणि कृष्णा पिंट्या निकम (इयत्ता तिसरी) अशी या पालकत्व स्वीकारलेल्या मुलांची नावे असून ते जि. प. सिंधुदुर्ग पूर्ण प्रा. शाळा करंजे नं. १ या प्रशालेत शिकत आहेत. कातकरी समाज हा आतापर्यंत आपल्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत जगात आला आहे. अनेकांना शिकण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेता येत नाही. भूषण सुतार यांनी केलेल्या या मदतीमुळे या मुलांचातरी शिक्षणाचा प्रश्न मिटला आहे. पोलीस हा मारझोड करतो, त्याच्या कडक स्वभावामुळे त्याला सर्वजण घाबरतही असतील. परंतु तो हे सर्व केवळ कायद्याचे रक्षण करण्यासाठी करत असतो, हे आपण विसरतो. भूषण सुतार यांनी केलेल्या या कामामुळे पोलिसांची एक वेगळी मानवतेची बाजू समोर आली असून अनेकांसाठी ती प्रेरणादायी आहे. भूषण सुतार यांच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.