समाज व्यवस्था बिघडविण्यास भद्र गट जबाबदार

समाज व्यवस्था बिघडविण्यास भद्र गट जबाबदार

 *कोकण Express*

*समाज व्यवस्था बिघडविण्यास भद्र गट जबाबदार*

*समाज साहित्य चळवळीमुळे तळकोकणात वैचारिक चळवळीला पुन्हा नव्याने प्रारंभ*

*ज्येष्ठ लेखक राजन गवस यांचे समाज साहित्य संमेलनात प्रतिपादन*

*उल्का महाजन, कृष्णात खोत यांना समाज साहित्य पुरस्कार ; फातर्पेकर दांपत्याचाही गौरव*

*सावंतवाडी ः  प्रतिपादन*

समाज व्यवस्था बिघडविण्यास भद्र गट जबाबदार असून श्रमिक, शोषित, शेतकरी वर्ग यांच्याशी या गटाने आपली नाळ तोडून टाकली आहे.या पार्श्वभूमीवर साहित्य हा समाजाचा भाग असतो असा विचार करून तळकोकणात समाज साहित्य चळवळ सुरू करण्यात आली, हा तळकोकणातील वैचारिक चळवळीचा पुन्हा नव्याने प्रारंभ आहे.असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, साहित्य अकादमीचे सल्लागार सदस्य डॉ राजन गवस यांनी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य संमेलनात केले.
समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गचे समाज साहित्य संमेलन सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात डॉ. गवस यांच्या अध्यक्षतेखाली आणि कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले. यावेळी कष्टकरी वर्गाच्या नेत्या उल्का महाजन यांना इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर तर कादंबरीकार कृष्णात खोत यांना काशिराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कादंबरी पुरस्कार डॉ.गवस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी लोककला अभ्यासक प्रा. विजयकुमार फातर्पेकर आणि ज्येष्ठ लेखिका पद्माताई फातर्पेकर यांचा समाज साहित्य संघटनेतर्फे डॉ.गवस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर, समाज साहित्य संघटनेचे संस्थापक कवी अजय कांडर, संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे विश्वस्त प्रा. वैभव साटम, प्रा. नीलम यादव, कार्यवाह सरिता पवार, उपाध्यक्ष प्रा. मनीषा पाटील, कोषाध्यक्ष प्रमिता तांबे, सदस्य ऍड मेघना सावंत, प्रा.प्रियदर्शनी पारकर, निमंत्रित सदस्य विजय सावंत, धरणग्रस्तांचे नेते कोंम्रेड संपत देसाई, सत्यशोधक संघटनेचे अंकुश कदम, महेश पेडणेकर, महेश परुळेकर, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ गवस म्हणाले,उल्का महाजन यांनी आदिवासी शेतकरी वर्गासाठी केलेले काम थक्क करणारे आहे.पण व्यवस्था बिघडवणारा एक स्वतंत्र गट निर्माण झाला आहे, तो गट म्हणजे भद्र गट. ह्या गटाने आपल्या हक्कासाठी कधी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला नाही. तळागाळात घाम गाळून जगणारा श्रमिक वर्ग, शेतकरी वर्ग यांच्याशी असणारी नाळ ह्या गटाने तोडून टाकली आहे. समाज आणि साहित्यातही हे दृश्य पाहायला मिळते.
प्रा.बांदेकर म्हणाले, समाज साहित्य संघटनेने उल्काताई महाजन, कृष्णात खोत यांच्यासारख्या मातीशी नाळ असणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली ही खूप महत्त्वाची घटना आहे. समाज साहित्य संघटना चांगलं काम करत असून एक लेखक म्हणून समाज साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांचा एक मित्र म्हणून मी स्वतः या सगळ्यांशी कायम सोबत असेन!
प्रा.खोत म्हणाले, आज एखादा भाग विस्थापित होतो असे नाही तर सारा समाजच विस्थापित झाला आहे.माणसं घर, जमिनीसह विस्थापित होतात. पण अलीकडल्या काळात मात्र बहुसंख्य वर्ग हा आपल्या मेंदूने विस्थापित झाला आहे. त्यामुळे जगण्याचे प्रश्न आजच्या काळात अधिक जटिल झाले आहेत.
उल्का महाजन, म्हणाल्या ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’ असं म्हणणारा उद्योग समूह आता शोषित, आदिवासी समाज यांची जमीन ताब्यात घेण्यासाठी सरसावला आहे.पण समाजाचा नियोजित दबाव असेल तर आपण अशा उद्योगपतींना व अशा उद्योगपतींना साथ देणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेलाही नमवू शकतो हे रायगडमधील सेज प्रकल्प आदिवासींच्या आंदोलनातून रद्द झाला तसेच दिल्लीतील शेतकऱ्यांसमोर केंद्रशासन नमले यातून सिद्ध झाले आहे. आदिवासी, शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या बाजूने कोणच नसते. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन घ्यायची वेळ येते तेव्हा कागदोपत्री नदी आणि धरणेही गायब होतात. नदी आणि धरणांचे पाणी दुसरीकडेच कुठेतरी कळवलं जातं. अशा वेळी आपण सावध राहून सत्ता व्यवस्थेशी संघर्ष करायला हवा.अशा व्यवस्थेशी संघर्ष करून न्याय मिळविणाऱ्या आपल्या संघटनेला इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांच्या नावाचा पुरस्कार समाज साहित्य संघटनेने दिला हे औचित्यपूर्ण आहे.
यावेळी प्रा.विजय फातर्पेकर, अजय कांडर, मधुकर मातोंडकर यांनीही विचार व्यक्त केले. मानपत्राचे वाचन प्रमिता तांबे यांनी केले. कवी विजय सावंत यांनी इतिहासकार गुरुवर्य केळुसकर यांचे ग्रंथ गवस सरांच्या हस्ते समाज साहित्य संघटनेला भेट दिले.
दुसऱ्या सत्रात कवी गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या-नव्या कवींचे कविसंमेलन चांगलेच रंगले. प्रमिता तांबे आणि मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा.गवस यांचा सत्कार प्रा साटम यांनी तर प्रा बांदेकर यांचा सत्कार श्री मातोंडकर यांनी केला. स्वागत सरिता पवार, नीलम यादव, ऍड मेघना सावंत, प्रियदर्शनी पारकर, विजय सावंत यांनी केले. सरिता पवार यांनी आभार मानले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!