*कोकण Express*
*फोटो वाचने ही कला असून ती आत्मसात करा; इंद्रजीत खांबे यांचे प्रतीपादन*
*फोटोग्राफरच्या अंगी संयम असने गरजेचे*
*कासार्डे ः संजय भोसले*
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि व्हिजन आय फोटो व्हिडीओ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोटोग्राफी कार्यशाळेत कणकवलीचे डॉक्युमेंटरी फोटोग्राफर इंद्रजीत खांबे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये पत्रकार व फोटोग्राफी अभ्यासकांची 15 डिसेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .
यावेळी व्यासपीठावर अभ्यासकांचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव, कार्यशाळा सहसंयोजक अभिजीत गुजर, माजी समन्वयक डॉक्टर रत्नाकर पंडित ,फोटोग्राफर स्वप्निल पवार. आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर शिवाजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यशाळा संयोजक अभिजीत गुर्जर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी इंद्रजीत खांबे पुढे म्हणाले की ,कौटुंबिक डॉक्युमेंट्री पासून सुरु झालेला डॉक्युमेंटरी चा प्रवास अद्यापही चालूच असून यादरम्यान अनेक चढ उतार पाहण्यात आले .कोकणातील ओम प्रकाश चव्हाण या दशावतार कलाकारावर केलेल्या डॉक्युमेंट्रीने ,मला एक वेगळीच ओळख करून दिली .छोट्या छोट्या विषयावर प्रत्येक व्यक्तीच्या भावभावना टिपताना बरेच काही शिकता आले. मग ते कोल्हापुरातील कुस्त्यांच्या तालमी असो वा कुस्त्यांचे फड. रस्त्यावर अथवा कुठेही मनाला भावेल अशा कलाकृती कॅमेऱ्यात बंद करत गेलो आणि माझा प्रवास जर्मनी पर्यंत कधी पोहोचला हे समजलेच नाही. सध्या टू बर्ड्स नावाने जर्मनीत प्रदर्शन सुरू आहे. फोटोग्राफी मधला परमोच्च क्षण कोणता असेल तर ओम प्रकाश चव्हाण त्यांचे पुरुषाचे स्त्री रूपांतरित होतानाचा कॅमेरात कैद केलेला क्षण होय.
वाइल्ड लाइफ फोटोग्राफी कार स्वप्निल पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या सजीवांची फोटोग्राफी करतानाही त्यांच्या दैनंदिन कार्यात अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे असून त्यांचा आदर करणे, त्यांना त्रास होणार नाही असे पाहून प्राण्यांच्या डोळ्यातील भाव पकडता आले पाहिजेत. फोटोग्राफी करताना प्रकाशाची जादू लक्षात आली, की हवी तशी दृश्ये कॅमेरात टिपता येतात ,मात्र झटपट प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनेक प्राणी ,पक्षी ,वनस्पती यांचेवर अत्याचार होताना पहावयास मिळते .वन्य जीव संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन होताना पाहायला मिळते. ही अत्यंत खेदाची बाब असून यासाठी काही नियम ,अटी,संकेत पाळणे गरजेचे आहे. गुणवत्ताधारक फोटोग्राफर व्हायचे असेल तर संयम असलाच पाहिजे, जंगल सफारी करताना एखादा प्राणी आपण शोधतो पण त्या अगोदर त्या प्राण्याने आपल्याला कितीतरी वेळा पाहिले असते .हेआपण विचारातच घेत नाही ,या सर्व बाबी लक्षात घेऊन फोटोग्राफी केल्यास भविष्य उज्वल आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व आभार डॉ. ग. गो .जाधव अध्यासनाचे समन्वयक शिवाजी जाधव यांनी मानले .त्यापूर्वी उपस्थितांच्या शंकांचे निराकरण मार्गदर्शकांनी केले .या कार्यक्रमाला विवेकानंद महाविद्यालयाच्या फोटोग्राफी विषयाचे शिक्षक रवीराज सुतार, फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी आणि कोल्हापूर परिसरातील फोटोग्राफी विद्यार्थी, तसेच पत्रकार विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.