*कोकण Express*
*शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..!*
*शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, त्याचा असा फायदा होणार…!*
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. आधार कार्डप्रमाणेचआता शेतकऱ्यांना 12 अंकी विशेष ओळखपत्र देण्यात येणार आहे. मोदी सरकार या विशेष उपक्रमावर सध्या काम करीत असून, लवकरच शेतकऱ्यांना हे ओळखपत्र दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली..
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तोमर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की देशातील आतापर्यंत 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी सुमारे 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटा बेस तयार करण्यात आला आहे. लवकरत या शेतकऱ्यांना 12 अंकी ओळखपत्र दिले जाणार आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांचा लाभ मिळविताना शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. शिवाय कृषी योजनांमध्ये काही गैरप्रकार झाले आहेत. त्यातून बनावट लाेकच योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे..
कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल
कृषी क्षेत्रासाठी राबविण्यात योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी हे विशेष कार्ड फायदेशीर ठरणार आहे. त्यातून गैरप्रकारांना आळा बसू शकेल. शिवाय, शेतीबाबतची माहिती खऱ्या शेतकऱ्यांना देता येईल. डिजिटल कृषी मिशनच्या प्रयत्नामुळे कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल, असे तोमर म्हणाले.
ओळखपत्र बनविण्याच्या योजनेत ‘ई-केवायएफ’ (e-KYF) द्वारे शेतकऱ्यांची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात सतत प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करावी लागणार नसल्याचे मंत्री तोमर यांनी सांगितले.
ते म्हणाले, की देशातील एकूण 11.5 कोटी शेतकऱ्यांपैकी साडेपाच कोटी शेतकऱ्यांचा डेटा बेस तयार झाला आहे.. उर्वरित काम सुरू आहे. प्रधानमंत्री कल्याण निधी योजनेतून (पीएम-किसान) दरवर्षी 2 हजार रुपयांचे समान हप्ते तीन वेळा दिले जातात, त्या सर्व शेतकऱ्यांना या आयडीचा लाभ मिळणार आहे.