*कोकण Express*
*आंगणेवाडी भराडी देवीचा वार्षिकोत्सव २४ फेब्रुवारीला*
*आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ्यांकडून तारीख जाहीर*
*मालवण ः प्रतिनिधी*
कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेची तारीख ठरली असून दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी भराडी मातेचा हा वार्षिकोत्सव साजरा होणार आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रेची तारीख कधी ठरते याबद्दल दरवर्षी सर्वांनाच उत्सुकता असते. धार्मिक रीतीरिवाजनुसार जत्रेची तारीख ठरविण्याचे विधी संपन्न झाल्यावर आज सकाळी आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ यांच्याकडून जत्रेची तारीख जाहीर करण्यात आली. ही जत्रा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.
दरम्यान, सध्या श्री देवी भराडी मातेच्या मंदिरात दिनांक ६ डिसेंबर २०२१ पासून म्हणजेच देव दिवाळीच्या दुसर्या दिवसा पासून ते श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक उत्सवात देवीची प्रथम ओटी भरे पर्यंत देवीची ओटी भरणे, गोड पदार्थ ठेवणे, नवस फेडणे आदी विधी व कार्ये बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही जत्रा केवळ आंगणे कुटूंबीय यांच्या पुरती मर्यादित ठेवून संपन्न झाली होती. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या जत्रेचे स्वरूप कसे असेल याबद्दल भाविकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
सध्या कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी नव्या व्हेरिएंट मुळे काहीशी धास्ती आहे. भराडी मातेने कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे आणि भक्तांना या महाउत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी असेच साकडे भाविकगण मनोमन देवीकडे घालत आहेत. त्यामुळे जत्रेत भाविकांना देवीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.