*कोकण Express*
*पेंडुर गावच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार…*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
आजपर्यंत अनेक संस्था पहिल्या मात्र अतिशय दुर्गम भागात ही संस्था चालवत असताना गावच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे. वर्षानुवर्षे या संस्थेमार्फत असेच लोकांना हवी असलेली सामाजिक, शैक्षणिक कामे होत राहावी व या भागाची प्रगती व्हावी, यासाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी पेंडुर येथे केले.
श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कला व क्रीडा संस्था, पेंडुर यांच्यामार्फत ९ डिसेंबर रोजी गुणगौरव व सत्कार सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, पद्मश्री परशुराम गंगावणे, जि.प.सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, तुळस सरपंच शंकर घारे, श्री.नेवगी, पेंडुर उपसरपंच प्रमोद शिरोडकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, आनंद माळकर, ताता मेस्त्री, अनिल परब, तुळस माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, विनय गोरे, आपा गावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गावातील १० वी, १२ वी, पदवीधर गुणवंत विद्यार्थी, इतर विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी तसेच गावातील वृद्ध दांपत्य गोविंद व भारती वैद्य, गंगाराम व प्रतिभा गावडे, सुरेश व हेमलता गावडे यांचा तर सर्पमित्र गोविंद गवंडे व दशावतारी कलाकार, तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे व पेंडूर गावचे सुपुत्र मुंबई पोलिस उपनिरीक्षक सिताराम गावडे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर गावात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे वाटपही करण्यात आले. यावेळी आई व वडील या दोघांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीला शिक्षणासाठी संस्थेकडून १५ हजार तर कार्यक्रमात नगराध्यक्ष संजू परब यांच्यामार्फत रोख १० हजार आर्थिक मदत करण्यात आली. काका सावंत यांनी सूत्रसंचालन तर संतोष गावडे यांनी आभार मानले.