नरेगा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त

नरेगा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त

*कोकण  Express*

*नरेगा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त*

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केला पाठपुरावा*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना नरेगा योजनेअंतर्गत प्राप्त होणारे अनुदान प्रलंबित होते. या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होण्याबाबत तालुका कृषी अधिकारी वैभववाडी यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन अनुदान प्राप्त झाले आहे.
शासनाच्या कृषी विषयक धोरणानुसार ग्रामीण भागातील पडीक जमीन लागवडीखाली येऊन शेतीचा विकास व्हावा तसेच शेतकर्‍यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने नरेगा योजना कार्यरत आहे.
जून २०२१ मध्ये वैभववाडी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी नरेगा योजनेअंतर्गत विविध फळझाडे यांची लागवड केली आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान प्राप्त झालेले नव्हते. याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती समजून घेऊन दि.१८ रोजी मेलद्वारे योग्य कारवाही करण्याबाबत विनंती केली होती. सदर मेलची प्रत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उप विभागीय अधिकारी, कणकवली, तहसीलदार, वैभववाडी व गटविकास अधिकारी वैभववाडी यांना पाठविल्या होत्या.
नरेगा अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान प्राप्त होण्यासंदर्भात ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून केलेला पाठपुरावा आणि कृषी कार्यालयाने केलेली योग्य कार्यवाहीमुळे लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष एकनाथ गावडे, संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव संदेश तुळसणकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!