*कोकण Express*
*”कोणी घर बांधण्यास मदत करता का मदत”ओझरमच्या गरीब शेतकर्याची आर्त हाक*
*योजनेच्या निकषाचे कारण देवून पात्रता असूनही घरकूल योजनेच्या ‘ड’ यादीतून नाव वगळले*
*कासार्डे ः संजय भोसले*
ओझरम् गावातील रहिवाशी व गरीब शेतकरी हरिश्चंद्र शिवाजी रहाटे .यांचे अतिवृष्टीमुळे घराचे खूप मोठे नुकसान झाले असून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या यादीत त्यांचे असलेले नाव देखील वगळण्यात आले असल्याने ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यानी वारंवार शासन दरबारी आपली कैफियत मांडली. पण कोणी दाद दिली नाही अखेर तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांना ही बाब समजल्याने त्यांनी रहाटे यांना न्याय मिळवून देण्यास पुढाकार घेतला आहे.
रहाटे सध्या ज्या घरात राहतात त्या घराच्या भिंती मातीच्या असून 2019 च्या अतिवृष्टीमुळे खुप मोठे नुकसान झाले तेंव्हापासून आजपर्यंत ते शासनाकडून ठोस मदतीच्या अपेक्षित आहेत. शासकीय अधिकार्यांकडून पडझड झालेल्या घराला नाम मात्र५०००/— रुपये एवढ्या तुटपुंज्या मदती व्यतिरिक्त उपेक्षे शिवाय काहीच मिळाले नाही. पंतप्रधान घरकुल योजनेच्या यादीत असलेले नाव देखील योजनेच्या निकषांचे कारण देऊन नाकारण्यात आले. तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आश्वासना व्यतिरिक्त काहीच हाती लागलेले नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यात “सुरक्षित घरकुल ” विना राहायचे कसे? हा एकच प्रश्न त्यांना पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हतबल होऊन सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांना ही सर्व हकिकत कथन केली. त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून सत्य परिस्थिती जाणून घेतली.
एका गरजू व पात्र सर्वसामान्य नागरिकास, शासनाच्या योजनेचा लाभ सहजासहजी मिळणार नसेल तर त्याचे हक्क व अधिकार मिळवून देण्याची सर्वतोपरी जबाबदारी, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपल्या सर्वांवर आहे .श्री. हरिश्चंद्र रहाटे त्यांना विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा. ही माफक अपेक्षा आहे. तरीदेखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास, ही बाब पंचायत राज समितीच्या दौऱ्यात निदर्शनास आणण्यात येईल .असा गर्भित इशारा तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी दिला आहे.