*कोकण Express*
*▪️वैभववाडीतील खड्डे हटवा,अन्यथा अधिकाऱ्यांना कोंडणार…*
*▪️अरविंद रावराणेंचा इशारा;पंचायत समिती बैठकीत बांधकाम विभाग “टार्गेट”…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील प्रमुख रस्ते अजूनही खड्ड्यातच आहेत. रस्ते दुरुस्तीबाबत वारंवार खोटी आश्वासने अधिकारी देत आहेत. खोटे बोलणा-या अधिकाऱ्यांची कीव येते.जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून ठेवणार,असा इशारा पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे यांनी दिला आहे.वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा नाधवडे येथे विद्यामंदिर ब्राह्मणदेव, नवलादेवीवाडी प्रशालेच्या सभागृहात सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी उपसभापती अरविंद रावराणे, पं.स. सदस्य मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच २६/ ११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नवीन पंचायत समिती इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करा. आता विलंब नको. परत परत वेळकाढूपणा खपवून घेणार नाही. असा इशारा मंगेश लोके, अरविंद रावराणे यांनी दिला. जलजीवन मिशन चे परिपूर्ण प्रस्ताव नसल्यामुळे अडचणी येत आहेत. तरी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे असे खाते प्रमुखांनी सांगितले. विकासाची कामे जलद गतीने झाली पाहिजेत. परंतु ती चुकीची होणार नाहीत याची काळजी अभियंत्यानी घ्यावी. २३ नंबर असलेल्या ठिकाणीच प्रस्तावित कामे झाली पाहिजेत. अन्य ठिकाणी काम केल्यास त्याला संबंधित अधिकारीच जबाबदार राहील. असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले.
रस्ते दुरावस्थेबाबत तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसात खड्डे भरण्याचे काम सुरू करतो असे सांगितले होते. परंतु करूळ दरम्यान माती टाकून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. अधिकारी खोटे बोलत आहे. असे खोटारडे अधिकारी असतील तर विकास कसा होणार असा सवाल अरविंद रावराणे यांनी उपस्थित केला. ठेकेदाराकडून काम करून घेणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. अधिकारी ती जबाबदारी पार पाडत नसतील तर त्यांना कोंडून ठेवणार. असा इशारा रावराणे यांनी दिला. आचारसंहितेत पाणीटंचाईची कामे करू शकता. परंतु भूमिपूजन कार्यक्रम करू शकत नाही. असे गटविकास अधिकारी श्री परब यांनी सांगितले. तालुक्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शिक्षकाला दोन वर्षांपूर्वी शिक्षा झाली. तो शिक्षक सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झाला. परंतु त्या शिक्षकाने त्या शाळेतील तीन शिक्षक व संबंधित पालकावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हे चुकीचे आहे. या शिक्षकाला संबंधित प्रशासनाने समज द्यावी. अन्यथा त्या शिक्षकाची धिंड काढणार असा इशारा लक्ष्मण रावराणे यांनी दिला आहे. या सभेत नाधवडे गावच्या वतीने गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नूतन कनिष्ठ अभियंता सतीश रावराणे व सावंत यांचा सत्कार करण्यात आला. या सभेत शाळेतील मुलांना बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.