*कोकण Express*
*▪️वैभववाडी रेल्वे स्टेशन परिसरात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग प्रवाशाला परत*
*▪️स्टेशन मास्तर संजय शिंगाडे, वाहतूक पोलीस विलास राठोड यांची सतर्कता*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी रेल्वे स्टेशन परिसरात विसरलेली अडीच लाख किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग स्टेशन मास्तर संजय शिंगाडे व वाहतूक पोलीस विलास राठोड यांच्या तत्परतेमुळे प्रवाशाला परत मिळाली आहे. प्रवाशी प्रवीण शंकर चौगुले रा. मोंड, ता. देवगड यांच्याकडे सदर बॅग सुपूर्द करण्यात आली आहे. श्री. चौगुले यांनी स्टेशन मास्तर शिंगाडे व राठोड यांचे आभार मानले.
प्रवीण चौगुले हे 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मांडवी ट्रेनने गावी आले. ते वैभववाडी स्टेशन वरती उतरले. दरम्यान त्यांच्या सामानातील एक बॅग घाईगडबडीत रेल्वे स्टेशन परिसरात राहीली. चौगुले देवगडला पोहोचल्यानंतर त्यांना बॅग राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस राठोड यांच्याशी संपर्क साधला. राठोड यांनी स्टेशन मास्तर यांना फोन करत माहिती दिली. स्टेशन मास्तर यांनी परिसरात असलेली लाल कलरची बॅग ताब्यात घेतली. रात्री 8 वाजता प्रवीण व ग्रामस्थ रेल्वे स्टेशन या ठिकाणी आले. स्टेशन मास्तर यांनी ती बॅग चौगुले यांच्या ताब्यात दिली.
त्या बॅगेत गळ्यातील सोन्याचा हार किमंत 50000 रु., मंगळसूत्र किंमत 100000, सोन्याची चैन किंमत 50000, कानातील कुड्या किंमत 20000, दोन अंगठ्या किंमत 20000, व रोख 5500 रुपये होते. स्टेशन मास्तर यांच्या समोर सदर दागिन्यांची चौगुले यांनी खात्री केली. बॅगेतील संपूर्ण ऐवज आपल्याला मिळाला असल्यास लेखी स्वरूपात चौगुले यांनी लिहून दिले आहे.