*कोकण Express*
*तहसीलदारांनी शेतकऱ्याच्या बांधावर जात केली भातकापणी*
जेव्हा तहसीलदार हातात कोयती घेऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्वतः भातकापणी करतात तेव्हा सर्वांनाच अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही याची प्रचिती कणकवली तालुक्यातील आशिये गावात आली.कणकवली तहसीलदार रमेश पवार हे आशिये गावातील शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले आणि हातात कोयती घेत पारंपरिक पद्धतीने भातकापणीही केली. शासनाच्या निर्देशानुसार महसूल अधिकाऱ्यांनी स्वतः शेतात जाऊन पिक कापणी प्रयोगांतर्गत 1 गुंठे क्षेत्रात किती भातपिक घेतले जाते याची पाहणी करावी लागते. त्याअनुषंगाने तहसीलदार रमेश पवार स्वतः भातकापणीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. मात्र तहसीलदार रमेश पवार हे जरी अधिकारी पदावर कार्यरत असले तरी स्वतः मुळात शेतकरी आहेत. आपल्या गावी नंदुरबारला गेल्यानंतर आपल्या शेतातील सर्व प्रकारची कामे ते स्वतः करतात हे विशेष आहे. आज आशिये गावात तहसीलदार रमेश पवार यांना शेतकऱ्याच्या शेतात जाऊन भातकापणी करताना पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. मात्र स्वतः तहसीलदारांनी आपल्या शेतात येऊन आपल्यासोबत भातकापणी केल्याने शेतकरीही सुखावला होता. यावेळी मंडळ अधिकारी मेघनाद पाटील, तलाठी सुवर्णा कडुलकर उपस्थित होते.