*कोकण Express*
*विजयादशमीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत देवगड येथील सदानंद गड येथे दुर्गपुजन आणि तोरण बांधणी*
*कणकवली आणि हरकुळ येथील शिवस्मारकांना केले वंदन*
*सिंधुदुर्गनगरी*
विजयादशमीनिमित्त ‘सह्याद्री प्रतिष्ठान’च्या ‘आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला’ या उपक्रमाखाली दसऱ्यादिवशी देवगड येथील सदानंद गड येथे दुर्गपुजन तोरण बांधणी करण्यात आले. तसेच कणकवली आणि हरकुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. जिल्ह्यातील दुर्गसेवक आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
‘सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान’ या दुर्गसंवर्धनासाठी वाहून घेतलेल्या शिवप्रेमींच्या संस्थेने यावर्षी विजयादशमीनिमित्त ‘आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला’ हा उपक्रम राज्यभरात राबवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना गड, कोट, दुर्ग, किल्ले यांची डागडुजी, उभारणी याकडे विशेषत्वाने लक्ष दिले. एकेकाळी महाराष्ट्राचे वैभव असलेले हे गडकोट आज दुर्लक्षित झाले आहेत. या गडकोटांबाबत जनजागृती व्हावी, आपला दैदिप्यमान इतिहास नव्या पिढीसमोर यावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विविध ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग होता.
“या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे. काहीतरी केले पाहिजे, आपला इतिहास टिकवला पाहिजे, असे नेहमीच बोलले जाते. मात्र तशी कृती होताना दिसत नाही. हे लक्षात घेता ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ संस्थेने राज्यभरात अनेक ठिकाणी श्रमदान आणि सेवाभावी वृत्तीने निरपेक्षपणे अनेक गडकोटांचे संवर्धन करण्याचा वसा हाती घेतला आहे, हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या उपक्रमांना युवकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी प्रतिष्ठान राबवित असलेले उप्रक्रम प्रशंसनीय आहेत”, अशी प्रतिक्रीया सतीश लळीत यांनी दिली आहे.
या उपक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकोट, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारके, तोफा यांचे पुजन करण्यात आले. या सर्व उपक्रमाचे नियोजन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग कणकवली विभागाचे दुर्गसेवक प्रकाश सावंत, नितेश मेस्त्री, विनोद पाटिल आणि प्रमोद मगर यांनी केले. यावेळी प्रमोद मगर, प्रकाश सावंत, प्रविण लाड, अनुजा पाटील, विनोद पाटिल, नितेश मेस्त्री, ऋषिकेश गोसवी, प्रशांत गुरव, अजय गुरव, सागर लाड, सुशांत चव्हान, प्रज्ञा परब, सागर डिचवलकर, गायत्री गावकर, ओंकार धुरी, आतिष कोरगावकर, रविंद विचारे, अनिकेत तर्फे, प्रतीक भाट, निल आचरेकर आदी उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या गडसंवर्धन कार्यात श्रमदान रुपाने किंवा आर्थिक रुपाने कोणी सहभागी होऊ इच्छित असल्यास दुर्गसेवक विवेक गावडे (95457 28929) किंवा प्रमोद मगर (86983 87138) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. ही चळवळ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्वांचे योगदान अपेक्षित आहे.