*कोकण Express*
*सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते; उदय सामंत…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
नागरी उड्डाण मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आय. आर. बी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाचे उदघाटन शनिवार ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता हा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम नसून निमंत्रित लोकांसाठीच असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग विमानतळाच्या उदघाटन कार्यक्रम नियोजनाचा आज पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी सुरक्षा यंत्रणेबाबत सक्त सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गवासीयांना अपेक्षित विमानतळाची सुरुवात होतेय. यावेळी होणाऱ्या उदघाटन समारंभाला प्रोटोकॉलप्रमाणे राज्य शासन, केंद्र शासनाचे मंत्री, प्रमुख अधिकारी यांच्यासाहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळींना निमंत्रिण देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जाहीर नसल्याने नागरीकांनी सहकार्य करावे. युट्युब व सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तर विमानतळाच्या बाहेर गेटवर एलइडी ची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे.
विमानतळाचे श्रेय कोणाला यापेक्षा सिंधुदुर्ग वासीयांच स्वप्न पूर्ण होतंय हे महत्वाचे आहे. पुढील काळात ५ ते ६ विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. हे विमानतळ फक्त दिवसासाठी असून जास्तीत जास्त विमान यावीत व सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान पाऊस थांबल्यानंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका रूपरेषे बद्दल माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, हे उदघाटन नागरी उड्डाण मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री उदय सामंत, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार सुरेश प्रभू, विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, दिपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उद्योग अप्पर सचिव बलदेवसिंह बापरसे, महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, नागरी उड्डाण, पर्यटन, प्रधान सचिव वर्षा नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील डुबळे, बाळा दळवी, युवासेना जिल्हा अधिकारी हर्षद गावडे, वेंगुर्ले शहरप्रमुख अजित राऊळ, सचिन वालावलकर, योगेश तेली, मनोहर येरम यांच्यासाहित अधिकारी उपस्थित होते.