*कोकण Express*
*महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांचे थकीत वीज देयक प्रकरणी निलंबन…*
तालुक्यात ९ कोटी ५६ लाखांची वीज देयकांची थकबाकी असल्याने सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.तसेच आठवड्यात दोन वेळा सावंतवाडी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश निलंबन करताना वीज वितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिले आहेत.
महावितरण कंपनीचा तोटा वाढत आहे. त्यातच कोरोनाचा फटकाही बसला आहे. अनेक वीज ग्राहकांनी आपली वीज देयके अदा केलेली नाही. त्यामुळे महावितरणची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीज प्रवाह खंडीत करण्याबरोबरच अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. कोकण परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या कणकवली तालुक्यात ११ हजार ग्राहकांकडे मोठी थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी कणकवली येथील सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांचे निलंबन केले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना विचारले असता त्यांनी नलावडे यांच्यावर कारवाई करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांनी आपली थकबाकी वेळीच भरून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन देखील केले.वीज देयक थकबाकीमुळे एका अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत कारवाई झाल्यामुळे वीज वितरण मध्ये एकच खळबळ उडाली आहे.