*कोकण Express*
*बेपत्ता बॅक अधिकारी मनोहर गावडे सुखरूप घरी परतला….*
*…त्याने आत्महत्या केली नव्हती तर तसा बनाव केल्याचे आता उघड…*
“सुसाईड नोट” लिहून बेपत्ता झालेला येथील एका खाजगी बँकेचा अधिकारी मनोहर गावडे हा अखेर घरी परतला आहे. त्यामुळे त्याने आपण आत्महत्या केली नव्हती तर तसा बनाव केल्याचे आता उघड झाले आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासिक अंमलदार तौफीक सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान तो नेमका कुठे होता, कशासाठी त्याने हा बनाव रचला हे काही वेळातच उघड होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित गावडे हा सात दिवसापूर्वी ओटवणे येथे आपल्या कारमध्ये सुसाईड नोट ठेवून बेपत्ता झाला होता. त्याने आत्महत्या केली असावी असा संशय होता मात्र ओटवणे नदीपात्रात शोध मोहीम राबविल्यानंतर सुद्धा त्याचा मृतदेह आढळून आला न्हवता. त्यामुळे तो जिवंत असावा असा कयास सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान तो शहरातून बाहेर पडताना कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला नसल्यामुळे त्याने जाणीवपूर्वक हा बनाव केला असल्याचे कालच पोलीस अधिकारी तौसिफ सय्यद यांनी मत व्यक्त केले होते. त्यानुसार त्यांनी आपली शोध मोहीम सुरू ठेवली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मनोहर याच्या भावाने फोन करून तो पहाटे घरी आल्याची पोलिसांना माहिती दिली आहे असे सय्यद म्हणाले. तो दाढी वाढलेल्या अवस्थेत असल्याचे कळते. तो काल रात्री उशिरा घरी परतला. सकाळी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून तो नेमका कुठे गेला होता, नेमका त्याने हा प्रकार कशासाठी केला याची चौकशी करण्यात येणार आहे असे श्री. सय्यद यांनी सांगितले.