*कोकण Express*
*सिंधुदुर्ग भाजपा चित्रपट कामगार आघाडी अध्यक्षपदी संतोष तेली यांची निवड*
भाजपा चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्षपदी सिनेकलाकार संतोष रामचंद्र तेली यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा कामगार आघाडी राज्य प्रदेशाध्यक्ष श्री गणेश ताठे, भाजपा चित्रपट कामगार आघाडी श्री विजय सरोज, सरचिटणीस सत्यवान गावडे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र श्री. तेली यांना देण्यात आले आहे. निवडीनंतर संतोष तेली यांचे जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.
संतोष तेली हे वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा गावचे सुपुत्र आहेत. फिल्म क्षेत्रात ते गेली 17 वर्षे कार्यरत आहेत. मुंबई येथे ओमी क्लासेसच्या माध्यमातून कला क्लासेस ते अनेक वर्षे चालवत आहेत. अत्यंत गरीब व खडतर प्रवासातून मार्गक्रमण करत त्यांनी या क्षेत्रात नाव कमावले आहे. नवे लक्ष सिरियल मध्ये सध्या ते काम करत आहेत. चित्रपट कामगार आघाडी ठाणे जिल्हा सरचिटणीस पदावर त्यांनी काम केले आहे. संघटनेच्या माध्यमातून कोरोना काळात गरीब व गरजूंना मदतीचा हात त्यांनी दिला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत राज्य प्रदेशने त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. कामगार नेते श्री. संजय कणेकर, भाजपा कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष श्री. गणेश ताठे, चित्रपट कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष श्री. विजय सरोज, प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे, भाजपा चित्रपट कामगार आघाडी प्रदेश सचिव रवींद्र महाडिक यांनी नुतन अध्यक्ष संतोष तेली यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी संतोष तेली म्हणाले, जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना एकत्रित आणण्याचा आपला मानस आहे. कोरोना काळात दुर्लक्षित झालेल्या कलाकारांना संघटनेच्या माध्यमातून बळ देण्याचे काम केले जाईल. ग्रामीण भागातील कलाकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविल्या जातील. या मातीतल्या कलाकारांना मोठे करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे या बाबी प्राधान्याने केल्या जातील असे सांगितले.