*कोकण Express*
*वाढत्या माहगाईवर नियंत्रण आणा…!*
*प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले निवेदन…!*
*भारतीय मजदूर संघातर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, वाढत्या माहगाईवर नियंत्रण आणा, कंत्राटी कामगार कायदा रद्द करा याप्रमुखमागण्यांसह इतर मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी संघाचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मागण्या कळविण्यासाठी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार उपस्थित होते.
याप्रसंगी सचिव हरी चव्हाण, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, संघटक सत्यविजय जाधव, राजेंद्र आरेकर, जयश्री मडवळ, हेमंत परब, अस्मिता तावडे, रिना हेर्लेकर, प्रणाली घाडीगांवकर, शुभांगी सावंत, विकास गुरव आदी उपस्थित होते.
डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल अन्य जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमी करून महागाईवर त्वरित नियंत्रण आणा, डिझेल, पेट्रोलसह अन्य पेट्रोलियम पदार्थ अन्य वस्तूंप्रमाणे जी.एस.टी.च्या कक्षेत आणा, अवाजवी नफाखोरी टाळण्यासाठी प्रत्येक वस्तूवर त्या वस्तूंचा उत्पादन खर्च छापण्याची कायद्याने सक्ती करा, राज्यातील घरेलू, बांधकाम, फेरीवाले, रिक्षा, टॅक्सीचालक, माळी, पुजारी, भटजी, सोनार कारागीर, शिंपी यासह असंघटित क्षेत्रातील कामगारांना रुपये 10,000 रुपये एवढी रक्कम अनुदान द्यावे, धातू आणि अन्य वस्तूंचे भाववाढीचा फायदा घेऊन साठमारी करणार्या व्यापार्यांवर कारवाई करा, शेतकर्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला देऊन उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना करा, खाद्यतेल डाळीबाबत देश आत्मनिर्भर करण्यासाठी खाद्यपदार्थांच्या किमतीवर नियंत्रण ठेवा, सार्वजनिक उद्योग आणि खासगी उद्योगातील कामगारांना महागाईच्या प्रमाणात मोबदला द्या, अत्यावश्यक वस्तू अधिनियम या कायद्याच्या कलम 3 (1) अन्वये डाळी, खाद्यतेल, कांदे, बटाटे आदी जीवनाश्यक बाबींना दिलेली सूट त्वरित मागे घ्या, मुंबईतील लोकल प्रवास सामन्यांसाठी त्वरित सुरु करा, महाराष्ट्रातील महाड, चिपळूण, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व अन्य भागातील पूरग्रस्तांना भरीव मदत द्या, या मागण्यांचा केंद्र व राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करून योग्य ते निर्णय सरकारने घ्यावेत, अशी विनंती भारतीय मंजूर संघातर्फे करण्यात आली आहे.
घोषणाबाजी परिसर दणाणला महागाईवर नियंत्रण आणा, जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा, असंघटित कामगारांना 10 हजार रुपये आर्थिक मदत त्वरित करा, कंत्राटी कामगार कायदा रद्द करा, अशी घोषणाबाजी भारतीय मजदूर संघाच्या सदस्यांनी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर करत परिसर दणाणून सोडला. तत्पूर्वी भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली पटकीदेवी येथून बाजारपेठमार्गे आप्पासाहेब पटवर्धन चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.