*कोकण Express*
*‘एमटीडीसी’ च्या माध्यमातून झालेल्या कामांची व्हावी चौकशी*
*नगराध्यक्ष संजू परब यांची किरीट सोमय्यांकडे मागणी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरात एमटीडीसीच्या माध्यमातून झालेल्या उद्यानाच्या तसेच अन्य कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत सखोल चौकशीची मागणी केली जाईल, असे आश्वासन किरीट सोमय्या यांनी दिले. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावले, नगरसेवक आनंद नेवगी, महेश धुरी, बटी पुरोहित, जावेद खतीब, सत्यजित बांदेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गेल्या काही वर्षात झालेल्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालले आहेत. या विरोधात आम्ही १५ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला देखील बसलो होतो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याची तक्रार केली आहे. परंतु कारवाई अद्याप केलेली नाही. त्यामुळे आपण या विषयाकडे लक्ष देऊन कामांची चौकशी करावी, अशी मागणी संजू परब यांनी यावेळी केली.