ओरोस नगरपंचायत स्थापना करावी

ओरोस नगरपंचायत स्थापना करावी

*कोकण Express*

*ओरोस नगरपंचायत स्थापना करावी*

*अरविंद मोंडकर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी*

*मालवण ः प्रतिनिधी*

ओरोस नगरपंचायत स्थापन व्हावी अशी तेथील स्थानिक जनतेची मागणी असून शासन दरबारी हा विषय ताटकळत पडला आहे. येत्या अधिवेशनात ओरोस नगरपंचायत बाबत निर्णय घेऊन नागरिकांची प्रतीक्षा संपवावी व जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ओरोस नगरपंचायत स्थापन होण्याबाबत अरविंद मोंडकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन निवेदन सादर करत लक्ष वेधले यावेळी त्यांच्या समवेत युवक काँग्रेसचे देवानंद लुडबे, वृषाल पाटील आदी उपस्थित होते. ओरोस, अणाव व रानबांबुळी या तीन गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची निर्मिती केली गेली. याठिकाणी सध्या सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्वात आहे. कुडाळ तालुक्यातील व मालवण तालुक्याला लागून असणारी ओरोस, अणाव व रानबांबुळी या ग्रामपंचायत भागातील गावांची एकत्रित मिळून ओरोस नगरपंचायत व्हावी अशी तेथील स्थानिक जनतेची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षात येथील नागरिकांनी प्रशासना जवळ मागणी केली असून त्यावर अधिसूचना निघून नंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी त्याबाबतचा अहवाल मंत्रालय येथे पाठवला आहे. मात्र शासन दरबारी हा विषय ताटकळत पडला आहे. ओरोस नगरपंचायत स्थापने साठी आता फक्त शासनाचा निर्णय होणे बाकी असून त्यावर अंमलबजावणी व्हावी, असे अरविंद मोंडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या २७ वर्षांत या ओरोस सिंधुदुर्गनगरीचा अपेक्षितरित्या विकास होऊ शकला नसल्याने आता मात्र तातडीने सरकारने यावर निर्णय देणे गरजेचे असून महसूलमंत्री म्हणून स्वतः लक्ष द्यावे. येत्या अधिवेशनात ओरोस नगरपंचायत बाबत निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे ही नगरपंचायत स्थापन होणार असल्याने येथील जवळच्या १० ते १२ गावांचा देखील मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. नगरपंचायत झाल्यास या प्राधिकरणकडे स्वतंत्र मोठ्या प्रमाणात निधी व कर्मचारीवर्ग मिळून या ठिकाणी स्वछता त्याच प्रमाणे व्यावसायिक बाजारपेठ अजून चांगल्या प्रकारे निर्माण होऊन जवळच्या गावातील अनेक तरुणांना महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध होईल. त्यामुळे कुडाळ मधील पणदूर, बांबर्डे, सिंधुदुर्गनगरीचा, मालवण मधील सुकळवाड, तळगाव, व नजीकच्या अन्य गावांचा विकास होण्यासाठी नगरपंचायत स्थापनेचा फायदा होईल. ही नगरपंचायत मुख्यालया जवळ असल्याने या नगरपंचायतीला प्राथमिकता द्यावी, अशी मागणी अरविंद मोंडकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!