देवगड पोलीस निरीक्षकपदी निळकंठ बगळे यांची नियुक्ती

देवगड पोलीस निरीक्षकपदी निळकंठ बगळे यांची नियुक्ती

*कोकण Express*

*देवगड पोलीस निरीक्षकपदी निळकंठ बगळे यांची नियुक्ती*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

देवगड पोलीस स्टेशन निरीक्षकपदी नीळकंठ उर्फ दीपक गोपाळकृष्ण बगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी देवगडचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. मेंगडे यांची कुडाळ येथे प्रशासकीय बदली झाली आहे.

निळकंठ बगळे हे सिंधुदुर्ग जिह्याचेच सुपुत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण कणकवली जि. प. शाळा नं. 4, माध्यमिक शिक्षण एस. एम. हायस्कूल तर पदवीचे शिक्षण कणकवली कॉलेज येथे झाले आहे. पुणे येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1998 साली सिंधुदुर्ग पोलीस सेवेत हवालदार म्हणून रुजू झाले. 2004 मध्ये नाशिक येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची 2005 मध्ये मुंबई येथे पीएसआयपदी नियुक्ती झाली. मुबईतील दिंडोशी, मालाड तसेच उच्चभ्रू वस्तीतील ओशिवरे पोलीस स्थानकात त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्याबद्दल त्यांचे वरिष्ठांकडून अनेकवेळा कौतुकही झाले. मुंबई येथे मोहल्ला कामिटी स्थापनेत पुढाकार घेत सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. कोकण विभागात बदली झाल्यानंतर त्यांनी जैतापूर नजीकच्या नाटे स्थानकात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले. त्यानंतर ते कोल्हापूरच्या नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची सिंधुदुर्गात जिल्हा नियंत्रण कक्ष येथे बदली झाली व त्यांना आता देवगड येथे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे ; बगळे

जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या अनुभवाच्या जोरावर सागरी भाग असलेल्या देवगड तालुक्यात कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपला भर राहिल. यासाठी येथील नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. सर्वसामान्यांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा, असे बगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!