*कोकण Express*
*सरपंच विम्याचे हफ्ते कोणती संस्था भरणार ?*
*सत्तास्थानांतून आमदार नितेश राणेंच्या टक्केवारीचा तपशील आमच्याकडे*
*शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा पलटवार*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
कालच कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी कोकणातील वसूली करणारा वाझे म्हणजेच किरण सामंत अशी टीका प्रसार माध्यमांच्या माध्यमातून केली. तसेच त्यांनी कोरोना संकटात जिल्ह्यातील सरपंचांनी जिवाची पर्वा न करता काम केले म्हणून 169 सरपंचाना मी स्वतः विमा पॉलीसी देणार, असेही जाहीर केले. जिल्ह्यातील एकूण सरपंच किती ? व 169 सरपंचानाच का ? जाहीर केल्यानंतर आजमितीपर्यंत 4 महीने झाले परंतु अजून सरपंचांना कुठल्या कंपनीचा विमा मिळणार ? किती लाखाचा असणार ? विम्याच्या रकमेचा हप्ता किती ? कुठली संस्था भरणार ? व किती रक्कम भरणार ? याचा खुलासा जिल्हावासियांना अजून झालेला नाही. देण्यात येणारा विमा एक वर्षासाठीच आहे. पण त्यापुढील विमा पॉलीसीचा हप्ता कोण भरणार ? व सरपंचांनी करोना काळात काम केले त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून गावातील पोलिस पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कमिटी मधील सदस्य यांनीही तेवढेच अहोरात्र कोरोना काळात आपल्या गावासाठी काम केले. त्यांच्या विम्याचे काय ? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केला आहे.
सरपंचांना ग्रामपंचायत मधून मिळणारे मानधन व उपसरपंचांना मिळणारे मानधन यांचा अभ्यास केल्यास विम्याची खरी गरज कोणाला आहे, याचा खुलासा होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सरपंचांना पॉलीसी देण्याचे जाहीर केले. परंतु त्यांनी एक वर्ष देणार, असे कुठेही म्हटले नाही. सरपंचांना देण्यात येणारी विमा पॉलीसी शासनाकडून देण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत असल्याने त्याला वेळ लागत आहे. काही सरपंचांचे नातेवाईक पॉझिटीव्ह आले. काही सरपंचांना आपल्या जिवाला मुकावे लागले. ही वस्तूस्थिती आहे व त्याचबरोबर गावागावात नियोजनबद्ध व्यवस्था न केल्याने गावातील ग्रामस्थांनाही आपले प्राण गमवावे लागले. जि. प. सदस्य फोडण्यासाठी पालकमंत्र्यांकडून पक्षांतरासाठी, जि. प. सदस्य, नगरसेवक यांना पैशाचे वाटप करण्यासाठी पैसा आहे. परंतू विमा देण्याला पैसा नाही, असे आरोप करण्यात आले. आमदार महोदय गेले 5 ते 7 वर्षे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत. परंतु शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी गावातील विकास कामांचा निधी वाटप करताना कुठलेही पक्षीय राजकारण न करता भरघोस दिला. हे आपण विसरलात का ? 7 वर्षापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते ? त्यावेळी असणाऱ्या पालकमंत्र्यांनी शिवसेनेसहीत इतर पक्षाच्या पदाधिकारी जि. प. सदस्य, ग्रा. पं. सदस्य, सरपंच, शाखाप्रमुख बुथप्रमुख यांना काँग्रेस पक्षामध्ये व स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश करून घेण्यासाठी किती पैशांचे वाटप केले ? तो पैसा कुठून आणला ? याचा खुलासा व हिशोब जिल्हावासीयांना प्रथम द्यावा. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पैसा कुठून आणला, याचाही शोध आम्ही घेवू, असे शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी म्हटले आहे.
इंकमटॅक्स व ईडीकडे चौकशी करण्याचा पत्रव्यवहार करणार, तर मागील 30 ते 35 वर्षे या जिल्ह्यामध्ये प्रमुख पदाधिकारी सत्ताधारी यांनी कशाप्रकारे पैसा कमविला, याबाबतही चौकशी करण्याचे लेखी निवेदन द्यावे. काही नावे पाहीजे असल्यास आमच्याशी संपर्क करावा. आम्ही आपणांस नावासहीत त्यांची असणारी पूर्वस्थीती व आजची स्थिती मालमत्तेसहीत माहीती देवू. ईडी व इनकमटॅक्सची चौकशी करण्याच्या आपल्या वक्तव्याचे आम्ही स्वागतच करु. सात वर्षापूर्वी आपण या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील वाडीवाडीत जे जे पेरले आहे, ते आता उगवत आहे. त्याबद्दल आपण जास्त दुःख न कराल तरच बरे. आपण जसे कृत्य करता ते योग्य आणि दुसऱ्याने केले तर ते अयोग्य हा न्याय कुठला ? पालकमंत्री दिपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी या जिल्ह्यामध्ये आणला. म्हणूनच आपल्यासोबत असणारा कार्यकर्ता आर्थीकदृष्ट्या फोफावला की नाही, याचाही अभ्यास केलात तर बरं होईल, असा टोलाही त्यांनी नितेश राणेंना लगावला आहे.
सध्यातरी आरोपांचा एवढाच खुलासा करीत आहे. आपली सत्ता असणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती याठिकाणच्या वसुलीसाठी अनेक ठिकाणी सचीन वाझे बसविले आहेत. सचीन वाझेंना लाज वाटेल असे सर्वसामान्यांकडून वसूली करणारे सचीन वाझे कोणाचे आहेत, याची प्रथम माहीती घ्यावी. आपल्या मतदार संघातील सत्तास्थांनांमधून आपली टक्केवारी किती आहे, याचाही तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे. यापुढे ज्या ज्या वेळी वेळ येईल त्या त्या वेळी आपल्या आरोपांचे पूराव्यासहीत खंडण करण्यास आम्ही सक्षम आहोत. जुन्या शिवसैनिकांवरती होणाऱ्या अन्यायाचा आपल्याला एवढा पुळका का ? शिवसैनिकांच्या ताकदीवर व हिमतीवर आपण हे सुगीचे दिवस सुखाने भोगत आहात. हे ही न विसरलेले बरे शिवसैनिकांबद्दल एवढाच जर पुळका असेल तर ज्यावेळी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, त्यावेळी शिवसैनिकांनी लाठ्या काठ्याचा खाल्लेला मार, खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवणे, धमकावणे हे विसरलात का ? व त्यावेळी जुन्या शिवसैनीकांबद्दल असणारी आस्था व आपले प्रेम कुठे गेले होते ? असा जळजळीत सवाल शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केला आहे. तसेच यापुढच्याही प्रत्येक आरोपाचे उत्तर आपणांस वेळोवेळी दिले जाईल, असा इशाराही त्यांनी आम. नितेश राणेंना दिला आहे