वीज प्रश्नी जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका!

वीज प्रश्नी जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका!

*कोकण Express*

*वीज प्रश्नी जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका!*

*भाजपा शिष्टमंडळाचा महावितरण कार्यकारी अभियंत्यांना इशारा!*

​​*तालुक्यातील ​वीज ​​मेंटेनन्सची कामे चार दिवसात मार्गी लावा!*

​*कणकवली  ः प्रतिनिधी*

तालुक्यातील वीज वितरणच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात भाजपा शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. गणेशोत्सवापूर्वी चार दिवसात वीज वितरणच्या ​​​​मेंटेनन्सची​ ​कामे मार्गी लावा. तसेच कलमठ, पिसे​कामते, ओसरगाव आदी भागातील वीज प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक घ्या व हे प्रश्न तातडीने निकाली काढा अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली. या मागणीला कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कणकवली तालुक्यातील ​वीज बिल थकबाकीदारांची वीज जोडणी गणेश चतुर्थीपर्यंत कट करू नये, अशी मागणी सभापती मनोज रावराणे व पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केली. मात्र थकबाकीची रक्कम मोठी असून, आम्हाला टार्गेट दिलेले आहे. नोव्हेंबर ​२०२० पासून काही वीज ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. त्यामुळे त्यांना थकबाकीचे टप्पे ठरवून देत ती भरणा करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याचे मोहिते यांनी सांगितले. मात्र​,​ यावेळी अण्णा कोदे यांनी तुम्हाला टार्गेट काहीही असले तरी लोकांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका असा इशारा दिला. कलमठ, वरवडे, ओसरगाव या ठिकाणच्या विविध प्रश्नांबाबत येत्या आठ दिवसात पंचायत समितीमध्ये स्वतंत्र बैठक घेत हे प्रश्न निकाली काढण्याबाबत मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा शिष्टमंडळा​​कडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे वीज वितरण अधिकारी नोंदवून घेत असताना केवळ शिष्टमंडळ आलं की मुद्दे नोंदवून घेता. हे प्रश्न सुटणार केव्हा? असा सवाल शिशिर परुळेकर यांनी केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व सहाय्यक अभियंता नलावडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शासनाने यापूर्वी वीजबिल माफी देणार असल्याचे आश्वासन दिल्याने ​२०२० पासून काही ग्राहकांनीच बिले भरली नव्हती. मात्र आता शासनाने घूमजाव केले. असा आरोप सभापती मनोज रावराणे यांनी केला. कलमठ,​ ​वरवडे, पिसेकामते आदी​ ​भागात सातत्याने लाईट जात आहे. ओसरगाव​,​ वागदे, बोर्डवे,​ ​कळसुली, हळवळ,​ ​लोरे गावात वारंवार जाणारी लाईट,​ ​लाईन वरील झाडी तोडणे,​ ​ट्रान्सफॉर्मर,​ ​गंजलेले पोल बदलणे,​ ​या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी भाज​पा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सभापती मनोज रावराणे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे,​ ​नगरसेवक शिशीर परूळेकर, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, प्रदीप गावडे,​ ​पप्पू पुजारे,​ ​सदा चव्हाण, करंजे सरपंच मंगेश तळगावकर,​ ​प्रदीप ढवण, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये,​ ​गौरव यादव,​ ​पंकज सावंत,​ ​निखील आचरेकर​ ​उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!