*कोकण Express*
*मनोरुग्णाने भुकेसाठी चक्क “कुत्रा” मसाला लावून भाजला…*
*कणकवलीतील घटना; उपनगराध्यक्ष यांच्या जागृतीमुळे अनर्थ टळला*
*कणकवली ः प्रतिनिधी
येथील फ्लायओव्हरच्या खाली राहणाऱ्या एका मनोरुग्णाने चक्क कुत्र्यालाच मसाला लावून भाजल्याचा प्रकार आज उघड झाला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी त्याला रोखले मात्र या प्रकाराची चर्चा शहरात जोरदार सुरू होती.
येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर फ्लायओव्हरखाली एक मनोरुग्ण गेले काही दिवस राहत आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोरुग्ण व्यक्तीने मृत कुत्रा सोबत आणला आणि आपल्या रोजच्या राहण्याच्या जागी गोळा केलेल्या लाकडांची आग पेटवून सोबत आणलेला मसाला सदृश्य पदार्थ कुत्र्याला फासून त्याने आगीत कुत्रा भाजण्यास सुरुवात केली. हा प्रकार तेथील नागरिकांनी पाहिला. मनोरुग्ण आगीत कुत्रा भाजत असल्याची घटना पाहून प्रत्यक्षदर्शीनी नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी तात्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मनोरुग्णाने भाजलेला कुत्रा काढून घेत त्याची विल्हेवाट लावली. उपनगराध्यक्षांच्या सतर्कतेने पुढील प्रकार टाळला.
भुकेसाठी हा प्रकार घडत असल्याचे पाहून श्री. हर्णे यांनी मनोरूग्ण व्यक्तीला हॉटेलमधून जेवण आणून देत माणुसकीचे दर्शन घडविले. यावेळी वाहतूक पोलीस चंद्रकांत माने, चव्हाण, मिथुन ठाणेकर, विशाल होडावडेकर, सोनू भंडारी, मुन्ना भंडारी आदी उपस्थित होते.