*कोकण Express*
*मग आमदार वैभव नाईक यांना पोटशूळ का आला…?*
*रणजीत देसाई ; शिवसेनेचे दोन आमदार असताना पालकमंत्री आयात करावा लागला हे दुर्दैव…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
नाहक कोणी अंगावर आले, तर शिंगावर घ्यायचे, हा नारायण राणे यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी थेट टीका केली. परंतु आमदार वैभव नाईक यांना त्यांचा पोटशूळ का आला?, असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असताना पालकमंत्री आयात करावा लागतो. यातच जिल्ह्यात आणि शिवसेनेत वैभव नाईक यांचे स्थान नेमके काय ? हे जनतेला कळले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे नमूद केले आहे की, दसरा मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री राणे व कुटुंबीयांवर त्यांचे नाव न घेता खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.खरं तर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या वणव्यात होरपळत असताना मुख्यमंत्री यांच्याकडून नागरिकांना दिलासा देणारी एखादी घोषणा अपेक्षित होती.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, मराठा आरक्षण किंवा अन्य महत्त्वाच्या विषयावर भाष्य न करता महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून ते अनेक नेत्यांवर वैयक्तिक टीका करून दसरा मेळावा पार पाडण्यात आला. गेल्या वर्षभरात ठाकरे सरकारला आलेले अपयश लपवण्याकरता व लोकांचे लक्ष अन्य ठिकाणी वळविण्याकरता मुख्यमंत्री महोदयांनी खासदार राणे व अन्य नेत्यांवर टीका केली आहे. माजी राणे यांची राजकीय कारकीर्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत सुरू झाली आहे.कारण नसताना कोणीही अंगावर आलं तर शिंगावर छ्यायचं हा त्यांचा स्वभाव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कोणतीही भीडभाड न बाळगता त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे श्री. नाईक यांना पोटशूळ का उठावा ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. श्री. नाईक यांनी नारायण राणेंवर टीका करण्यापेक्षा आपल्या वरिष्ठांना सुसंस्कृत भाषेचे धडे द्यावेत, असा सल्ला देखील त्यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असताना देखील ही या जिल्ह्यासाठी पालकमंत्री “आयात” करावा लागतो यातच श्री. नाईक यांचे शिवसेना पक्षात असलेले स्थान जनतेला कळले आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचे सहा वर्षे प्रतिनिधित्व करूनही रस्त्यांची झालेली दुरावस्था, मच्छीमारांचे प्रश्न, गौण खनिज व्यावसायिकांचे प्रश्न व अन्य बाबींमध्ये वैभव नाईक यांना पूर्ण अपयश आले आहे. त्यामुळे केवळ मातोश्रीची मर्जी संपादन करण्याकरता आमदार नाईक यांनी राणे यांच्यावर नाहक टीका करू नये, असा सल्ला श्री. देसाई यांनी दिला आहे.