*कोकण Express*
*नांदगाव तिठ्यावर रिक्षांचे नियमबाह्य पार्किंग;वाहतुकीस अडथळा..*
*सुरेश मोरये ; वाहतूक नियंत्रण अधिकारी यांना निवेदन*
तालुक्यातील नांदगाव तिठा येथे नियमबाह्य आणि वाट्टेल तसे रिक्षांचे पार्किंग होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नांदगाव तिठ्यावरील वाहतुकीस होणारे अडथळे दूर करावेत अशी मागणी नांदगाव तिठा येथील रहिवासी सुरेश अर्जुन मोरये यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी ओरोस येथील वाहतूक नियंत्रण अधिकारी यांना दिले आहे.
श्री.मोरये यांनी वाहतूक नियंत्रण अधिकारी, ओरोस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नांदगाव-फोंडा-कोल्हापूर या राज्य मार्गावर नांदगाव तिठा येथे नियमबाह्य पद्धतीने रिक्षा पार्किंग केल्या जात आहेत. माझ्या मालकीच्या इमारतीच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गाचा कॉर्नर आहे. तेथे रिक्षा उभ्या केल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तसेच डबल लाइन लावून रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा होतो. त्याबाबत रिक्षा व्यावसायिकांना विचारणा केली असताना आमची संघटना आहे असे सांगून अरेरावी केली जाते. त्यामुळे महामार्ग आणि राज्यमार्गावरील कॉर्नरवर होणारे वाहतुकीस अडथळे दूर करावेत. तसेच रिक्षा व्यावसायिकांसाठी योग्य त्या ठिकाणी जागा द्यावी, जेणेकरून वाहतूक अडथळ्यांमधून वाहन आणि आमचीही सुटका होणार आहे.