*कोकण Express*
*खासदार, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नाटळ मल्हार पुलाची पुनर्बांधणी…!*
*ब्रिज कोसळण्यास सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार…!*
*शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांचा आरोप…*
*कणकवली ः संजना हळदिवे*
तालुक्यातील नाटळ, नरडवे, दिगवळे दारिस्ते, शिवडाव या प्रमुख गावांना जोडणारा हा कणकवली कनेडी नरडवे रोडवरील नाटळ येथील मल्हार ब्रिज कोसळून पडल्यामुळे या सर्व गावांचा संपर्क तुटला आहे. योग्य नियोजन आणि दक्षता घेण्यास अपयशी ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागच या दुर्दशा होण्यास जबाबदार आहे, असा टोला शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी लगावला आहे.
प्रथमेश सावंत म्हणतात, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी हे निष्क्रिय आहेत. गेल्या महिन्यात मल्हार पुलाच्या एका पिलरचे फाउंडेशन वाहून गेल्याचे दिसले. त्यावेळी मी बांधकाम खात्याची संपर्क साधला व लगेचच दुसऱ्या दिवशी बांधकाम विभागाने डागडुजी स्वरूपात चिरे लावून निष्कृष्ट निकृष्ट बांधकाम केले. त्याच वेळी जर पाण्यात त्या पिलरला काँक्रीटची फाउंडेशन व भिंत बांधली असती किंवा नवीन टेक्नोलॉजीने जर दुरुस्ती केली असती, तर आज हा पूल वाचला असता व त्या सोबत ही पाच गावेही पोरकी झाली नसती. १९६७ साली रत्नागिरी जिल्हा असताना सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. तद्नंतर १५ वर्षांपूर्वी प्लास्टर करून त्याची प्राथमिक स्वरुपात डागडुजी केली होती. परंतु त्यानंतर या पुलाची कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. बांधकाम विभागाचे काम आहे की, गावातील सर्व विकास कामे, रस्ते, पूल याकडे लक्ष ठेवणे. परंतु आपण वारंवार पाठपुरावा करून देखील याची दखल न घेता या पुलाची कुठलीच डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नसल्याचा आरोप प्रथमेश सावंत यांनी केला आहे. मल्हार पूल कोसळल्याने पाच गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने कनेडी येथील मोहनराव मुरारी सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र हे या गावांचा आसरा होते. त्याचाही संपर्क तुटल्यामुळे आता आरोग्याच्या दृष्टीने हे गाव पोरके झाले आहेत. शाळा-कॉलेज, तलाठी, ग्रामसेवक यांचाही संपर्क तुटलेला आहे. या घटनेला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व त्याचे कर्मचारी जबाबदार आहेत आणि होणाऱ्या गावाच्या नुकसानीला देखील तेच पूर्णपणे जबाबदार आहेत. सदर पुलाची संपूर्ण परिस्थिती व त्यातून नवीन पुलाची मागणी आपण खासदार, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे फोनद्वारे केली असून त्यांनी लवकरात लवकर या पुलांची पुनर्बांधणी करून देऊ, याची ग्वाही दिल्याची माहिती शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी दिली आहे.