*कोकण Express*
*साजिरे गोजिरे रूप विविध प्रकारे पाहता येणार*
*चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी १६ विटेवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती*
*आषाढी एकादशी निमित्ताने एक आगळ्या वेगळ्या भक्तीचा संदेश*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
– नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरून चित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे. आषाढी एकादशी च्या निमित्ताने त्यांनी १६ विटांचा वापर करून प्रत्येक विटेवर पांडुरंगाचे मनमोहक चित्र रेखाटले असून देवगड तालुक्यात ते सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे.
चित्रकले मधून अक्षय मेस्त्री नेहमी वेगवेगळे प्रयोग करत आहेत, आणि त्याला सामाजिक टचही असतो. आषाढी एकादशी निमित्त १६ विटेवर वेगवेगळी चित्रे काढण्याचा संकल्प केला होता, त्यानुसार ५ जुलै पासून प्रत्येक विटेवर विठू रायाचे आकर्षक चित्र रेखाटले आहे. पुढील काही दिवस वेगवेगळ्या वेष भूषेतील पांडुरंग भक्तांना पाहता येणार आहे.
मागील वर्षी तुळशीच्या इवल्याशा पानावर अप्रतिम विठ्ठलाचे चित्र, शिवाय दीड एकर क्षेत्रात पॉवर ट्रीलरच्या साहाय्याने साकारलेला भव्यदिव्य पांडुरंग अख्या महाराष्ट्राने पाहिला होता. ड्रोन कॅमेराचा वापर करून तयार केलेला तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.
विटेवर साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या चित्रासाठी दररोज अर्धा तास वेळ दिला जात असे. भविष्यात या विटा प्रदर्शनात मांडणार असल्याचा मानस अक्षय याने व्यक्त केला आहे. सध्या ‘कोकण रात्र’ कोकणातील प्रतिबिंबित होणारी रात्र आणि गड किल्ले संवर्धनासाठी साद घालणारी ” हाक अस्मितेची” हे दोन महत्वपूर्ण उपक्रम सुरू असल्याचे अक्षय म्हणाला.