*कोकण Express*
*कोकण रेल्वेच्या समस्या दूर करा*
*केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांची चर्चा*
*कणकवली ः संजना हळदिवे*
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक, भाजपा नेते अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. या चर्चेदरम्यान प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या समस्या केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्यासमोर मांडल्या. त्यात विशेष करून रत्नागिरी – सिंधुदुर्गात रेल्वे विद्युतीकरण जलद रीतीने व्हावे, असे सांगण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांना पुरेसे प्लॅटफॉर्म नाहीत, ते प्लॅटफॉर्मचे काम त्वरित सुरू करावे व कोकणवासीयांची परवड दूर करावी, अशी विनंती दानवे यांच्याकडे करण्यात आली. यात प्रामुख्याने कोलाड इंदापूर करंजाडी, गोरेगाव, विन्हेरे, दिवाण खवटी, अंजनी, कामठे, सावर्डे, आरवली, भोके. निवसर, आडवली, विलवडे, राजापूर, सौंदळ इत्यादी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तसेच वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला जलदता प्राप्त करून द्यावी. ज्या समित्या कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येतात, त्या समित्यांवर अशासकीय सदस्य नेमावेत, अशी मागणी रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.